…अन् ती शंका खरीच ठरली, पवारांनी सांगितलं PMLA कायदा दुरुस्तीला का विरोध केला होता!
GH News May 17, 2025 11:07 PM

Sharad Pawar : खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे आज (17 मे) प्रकाशन झाले. या कार्यक्रमाला खासदार शरद पवार, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी पुस्तकावर तसेच पुस्तकात हाताळण्यात आलेल्या विषयावर भाष्य केलं. विशेष म्हणजे सरकारने विरोधकांवर सूडभावनेतून कारवाई केली हे सांगताना शरद पवार यांनी जुनी आठवण सांगितली. त्यांनी पीएमएलए कायद्यातील तरतुदीला का विरोध केला होता, याबाबत सविस्तर सांगितलं आहे.

त्या प्रस्तावला मी विरोध केला होता

“मला आवठतं की त्यावेळी मी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. पी. चिदंबरम हे त्यावेळी माझे सहकारी होते. चिदंबरम यांनी कायद्यात दुरुस्ती करण्याची कशी आवश्यकता आहे, या संबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समोर आणाला. तो प्रस्ताव वाचल्यानंतर मी डॉ. मनमोहन सिंग यांना सांगितलं की, हा प्रस्ताव अत्यंत घातक आहे. हा प्रस्ताव मान्य होता कामा नये अशी भूमिका मी घेतला होती,” अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.

पहिली कारवाई चिदंबरम यांच्यावरच झाली

तसेच, “आरोपीला मी गुन्हा केला नाही, गुन्हेगार नाही हे सिद्ध करण्याची तरतूद या कायद्यात केली गेली. मी याला स्पष्ट विरोध केला होता. उद्या राज्य बदललं तर त्याचा परिणाम आपल्यालाही भोगावा लागू शकतो, असं मी म्हणालो होते. पण ते ऐकलं गेलं नाही. राज्य गेलं आणि पहिली अडचण कारवाई ही चिदंबरम यांच्यावर केली गेली. त्यांना अटक करण्यात आलं. सत्तेचा गैरवापर त्याठिकाणी झाला,” असंही शरद पवार यांनी सांगितलं.

शरद पवार यांनी संजय राऊतांच्या पुस्तकावरही भाष्य केलं

संजय राऊतांच्या पुस्तकात दोन राजवटींचा पुस्तकात उल्लेख आहे. एक एनडीएच्या काळात आणि नंतर यूपीएच्या काळातील. ईडीने कोणत्या पक्षांवर केसेस केल्या याची माहिती आहे. एनडीएच्या काळात 21 जणांवर कारवाई केली होती. यूपीएच्या काळात 9 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. अटक कुणाला केली नाही. एनडीएच्या काळात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादी, शिवसेना, द्रमुक, बिजू जनता दल, आरजेडी, बसपा, सपा, टीडीप, आप, मार्क्सवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, मनसे, अण्णा द्रमुक, टीआरएस एवढ्या पक्षाच्या नेत्यांवर चौकशा करून केसेस केल्या, असंही शरद पवार म्हणाले.

तसेच मी विचार करतोय, हे पुस्तक वाचल्यावर महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने देशात परिवर्तन केलं तर पहिलं काम हे करावं लागेल राजकीय पक्षांचा जो अधिकार आहे, जो ईडी कायद्याचा आधार घेऊन उद्ध्वस्त करायचा जी तरतूद झाली आहे, ती बदलावी लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.