पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुण्यातील इसिस स्लीपर मॉड्यूलप्रकरणी (ISIS Sleeper Module) दोन फरार आरोपींना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) अटक केली आहे. अब्दुल्ला फैयाज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तलग खान अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही इंडोनेशियातील जकार्ता येथे लपून बसले होते आणि भारतात परतण्याच्या प्रयत्नात होते.
ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या (Bureau of Immigration) अधिकाऱ्यांनी टर्मिनल दोनवर त्यांना ओळखले आणि (NIA) ताब्यात दिले. या दोघांवर एनआयएच्या विशेष न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यांच्या अटकेसाठी एनआयएने प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.
पुण्यातील स्लीपर मॉड्यूलचा कटया प्रकरणाचा संबंध २०२३ मधील पुण्यात आयईडी (विस्फोटक उपकरण) तयार करून त्याची चाचणी करण्याच्या कटाशी आहे. आरोपींनी पुण्यातील कोंढवा भागातील एका भाड्याच्या घरातून बॉम्ब तयार करण्याचे काम केले. त्यांनी तिथे बाॅम्ब बनवण्याचे प्रशिक्षण शिबिरही आयोजित केले होते आणि स्वतः तयार केलेल्या आयईडीचा नियंत्रणात स्फोट करून प्रयोग केला होता.
देशाविरोधातील कट उघडया दोघांसह एकूण १० आरोपी भारतात दहशत निर्माण करून इस्लामिक शासन प्रस्थापित करण्याच्या इसिसच्या कटात सहभागी आहेत. त्यांनी देशविरोधी कारवाया करत देशातील शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
एनआयएने यापूर्वीच या प्रकरणात त्यांच्यावर युएपीए, स्फोटक पदार्थ अधिनियम, शस्त्र अधिनियम आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांअंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. महम्मद इम्रान खान, महम्मद युनुस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसीरुद्दीन काजी, झुल्फिकार अली बारोदवाला, शमिल नाचन, आकिफ नाचन आणि शहानवाज आलम. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता असून, चौकशी करण्यात येत आहे.