आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 58 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही तासांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु होती. त्यामुळे बराच वेळ पाऊस थांबवण्याची आणि खेळपट्टी कोरडी होण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र खेळ होऊ शकणार नसल्याचं स्पष्ट होताच सामना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. आयपीएलकडून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सामना रद्द होण्याची ही तिसरी वेळ ठरली.