Sanjay Raut Book : मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांचे नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाला खासदार शरद पवार, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, लेखक शरद तांदळे तसेच पश्चिम बंगालचे खासदार साकेत गोखले उपस्थित होते. या कार्यक्रमात गोखले यांनी केलेल्या भाषणाची सध्या चांगीलच चर्चा होत आहे.
साकेत गोखले यांनीदेखील राऊतांप्रमाणेच साधारम नऊ महिने तुरुंगवास भोगलेला आहे. त्यामुळे त्यांनी राऊतांच्या या पुस्तकाचे तोंडभरून कौतुक केले. जेल हा नरक असतो. बॉलिवूडमध्ये दाखवलं जातं की राजकीय व्यक्ती आत गेला तर एसी वगैरे मिळतो. पण विरोधक जर आत गेला तर त्याला वाईटातील वाईट वागणूक दिली जाते. कारण त्याला मोडायचं असतं, असं मत गोखलेंनी व्यक्त केलं.
तसेच, तुम्हाला जामीन मिळेल. सेटलमेंट करा, अशी ऑफर देण्यात आली होती. एक व्यक्ती पाच वर्षापासून आत होता. त्याने ३५ रुपयाची दुधाची पिशवी चोरली होती. पण 500 रुपये जामीन भरायला नव्हते म्हणून तो आतमध्ये राहिला. तो मला म्हणाला, आईच्या पोटातही बाळ नऊ महिन्यापेक्षा जास्त राहू शकत नाही. तर आपण काय राहणार. तुम्ही लढत राह, अशी आठवण गोखले यांनी सांगितली.
गोखले यांनी तुरुंगातील अधिकाऱ्याशी झालेल्या संभाषणाचीही एक आठवण सांगितली. मला तुरुंगातील अधिकारी म्हणाला होता की तुरुंगातून दोनच लोक बाहेर जातात. एक म्हणजे पहिला व्यक्ती कोलमडून बसतो आणि दुसरे म्हणजे त्या व्यक्तीच्या मनातील भीती संपून जाते. राऊत हे दुसऱ्या प्रकारचे आहेत. डोक्यावर बंदूक असतानाही संजय राऊत यांना भीती नव्हती. एकदा गोळी झाडली की भीती संपते. गोळी झाडल्यानंतरही राऊत यांना भीती नव्हती, अशी स्तुती गोखले यांनी केली.
विश्वास आणि दुसरी ही गोष्ट मिळवता येत नाही. आम्ही तुरुंगात राहिलो. आमचा छळ झाला. मनात एकच होतं. आमचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे असो की ममता बॅनर्जी यांच्याबरोबर आम्ही गद्दारी करणार नाही. हे सर्व नेते कार्यकर्ते आणि त्यांच्या पाठी ठाम असतात. बाकीचे लोकं समजू शकत नाही. जेलची भीती घालणं सोपं असतं. पीएमएलए कायदा आहे, त्या अंतर्गत सरकारला प्रुव्ह करायचं नसतं तुम्ही गुन्हेगार आहात. तर तुम्हालाच तुम्ही गुन्हेगार नाही हे सिद्ध करायचं असतं. त्यात तीन ते चार महिने जातात. तिच भीती घातली जाते. माणसं तोडले जातात. पक्ष फोडले जातात, असा आरोपही गोखले यांनी केला.