भाजपकडून ईडीचा गैरवापर करून विरोधी पक्षातील नेते फोडले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे.
गोरेगाव पत्रचाळ प्रकरणी ईडीकडून अटक होण्यापूर्वी एकनाथ शिंदेंनी फोन करून 'यासंदर्भात अमित शहांशी बोलू का?' असे विचारले होते. यावर संजय राऊतांनी, 'तुम्ही वरती जरी बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही', असं संजय राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाले होते. राऊतांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अटकेआधी अमित शहांना फोन
गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या संवादाचा खुलासा यांनी केला आहे. राऊत म्हणाले, "मी स्वतः अमित शहा यांना रात्री ११ वाजता फोन केला. ते त्या वेळी कामात होते. चार-पाच मिनिटांनी त्यांनी मला परत फोन केला. मी त्यांना विचारलं, माझ्या निकटवर्तीयांना आणि कुटुंबियाला त्रास दिला जात आहे, रेड टाकल्या जात आहेत, धमक्या दिल्या जात आहे. हे तुमच्या मंजुरीने होतंय का? जर मला अटक करायची असेल तर मी दिल्लीच्या घरी आहे. ही नौटंकी बंद करा." असं राऊत म्हणाले. यावर अमित शहांनी मला यासंदर्भात काहीच माहित नाही, असं उत्तर दिलं होतं, असं संजय राऊत म्हणाले.
अमित शहा यांना फोन करू का?
ईडीकडून अटक होण्यापूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना फोन केला असल्याचा दावा राऊतांनी केला. राऊत म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांनी मला अटक होण्याआधी फोन केला होता. त्यांनी विचारलं की मी वरती बोलू का? अमित शहा यांना फोन करू का? त्यावर मी त्यांना स्पष्ट सांगितलं, काही गरज नाही. तुम्ही वरती बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही", असा खुलासा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.
भाजप-शिवसेना नात्याच कटूता शहांमुळे
याशिवाय, राऊतांनी यांच्यावर थेट आरोप करताना म्हटलं की, भाजप-शिवसेना नात्यांमध्ये कटुता निर्माण होण्यामागे त्यांचा मोठा हात होता. "हे मी १०० टक्के खात्रीनं सांगतो की, अमित शहा यांच्यामुळेच शिवसेना आणि भाजपमधील संबंध बिघडले. आमचे नरेंद्र मोदींसोबत चांगले संबंध होते. पण जेव्हापासून अमित शाह दिल्लीमध्ये सक्रिय झाले, तेव्हापासूनच कटुता वाढू लागली", असा आरोप संजय राऊत यांनी केला.