शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन करून आदर्श निर्माण केला – शरद पवार
Marathi May 19, 2025 11:24 AM

या देशामध्ये अनेक कर्तृत्ववान राजे होऊन गेले. मात्र, त्यांचे राज्य हे कुटुंबापुरते मर्यादित होते. आणि ते त्यांच्या नावाने ओळखले जायचे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला कोणी भोसले यांचे राज्य असे म्हटले नाही. शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन करून एक आदर्श निर्माण केला, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व शिवस्पर्श प्रकाशनातर्फे छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘शिवपुत्र महोत्सव’ कार्यक्रमात ‘शिवपुत्र छत्रपती शंभूराजे पुरस्कार’ इतिहास संशोधक डॉ. प्रकाश पवार यांना, तर ‘महाराणी ताराराणी पुरस्कार’ माणदेश फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा चेतना सिन्हा यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीराम पवार, आमदार बापू पठारे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अॅड. शैलजा मोळक, ज्ञानेश्वर मोळक, प्रवीण गायकवाड, राजाभाऊ चोपदार उपस्थित होते.

बाबा भांड यांनी सयाजीराजे गायकवाड यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांचा इतिहास लपवला गेल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

यावेळी डॉ. प्रकाश पवार यांचे ‘सकलजनवादी छत्रपती आणि त्यांचे आजच्या काळातील महत्त्व’ या विषयावर व्याख्यान झाले. चेतना सिन्हा यांनी माणदेश फाऊंडेशनचा प्रवास उलगडला. यावेळी अॅड. शैलजा मोळक यांनी लिहिलेल्या ‘जिजाऊ सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी’ आणि रजिया सुलताना यांनी लिहिलेल्या ‘ताराबाई शिंदेच्या निबंधातील सामाजिक वास्तव’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

माणदेशी माणसे लढवय्या प्रवृत्तीची

माणदेशाची ओळख ही दुष्काळी भाग म्हणून आहे. माणदेशातील दुष्काळी परिस्थितीच्या वेळी केंद्रात मंत्री असताना अनेक वेळा मदत उपलब्ध करून दिली आहे. दुष्काळी भाग असला तरी माणदेशाने महाराष्ट्राला अनेक कर्तृत्ववान माणसे दिली आहेत. माणदेशातील नागरिकांनी लढवय्या प्रवृत्तीने दुष्काळावर मात केली, असे शरद पवार म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.