मुंबई : सरन्यायाधीश भूषण गवई आज मुंबई दौऱ्यावर असताना राजशिष्टानुसार त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे महत्त्वाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक या दादर येथील चैत्यभूमीवर पोचल्या.
मुंबईमध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलकडून नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. सरन्यायाधीश मुंबई दौऱ्यावर असताना राज्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी राजशिष्टाचारानुसार त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणे आवश्यक असते. आज पहिल्यांदाच त्यांचे मुंबईत आगमन झाले असताना राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक, मुंबईचे पोलिस आयुक्त यांची गैरहजेरी होती. याबद्दल सरन्यायाधीशांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या नाराजीनंतर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक या दादर येथील चैत्यभूमी येथे पोहोचल्या. तसेच वरिष्ठ अधिकारीसुद्धा पुढील कार्यक्रमाला हजर झाले.
देशाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राचे असून नियुक्तीनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. पण पोलिस महासंचालक, मुख्य सचिव आणि पोलिस आयुक्तांना येथे यावे वाटले नाही, हे योग्य असेल तर त्याचा विचार त्यांनीच करावा, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमानंतर सरन्यायाधीश चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले. तिथे मात्र रश्मी शुक्ला आणि सुजाता सौनिक दाखल झाल्या.
...अन्यथा वास्तुविशारद व्हायचे होतेसत्काराला उत्तर देताना सरन्यायाधीश म्हणाले,‘‘माझ्या प्रवासाची सुरुवात अमरावती जिल्ह्यात झाली, नगरपरिषदेच्या शाळेमध्ये मी शिकलो वाढलो. आज मी जो काही आहे, ते आई-वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यामध्ये फार मोठा सहभाग आहे. एवढ्या वर्षांनंतरही ‘एससी’ व ‘एसटी’ प्रवर्गातून अजून कोणीच सरन्यायाधीश झाले नाही, असे मला विचारले गेले. केवळ वडिलांच्या इच्छेखातर वकिली क्षेत्रात आलो, अन्यथा वास्तुविशारद व्हायचे होते, अशी आठवण त्यांनी नमूद केली.