कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) राजकारणात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच महायुतीचा अध्यक्ष पाहिजे, अशी टूम पुढे केल्याची चर्चा आहे. त्यातून अध्यक्षपदासाठी नविद मुश्रीफ यांची दावेदारी प्रबळ मानली जात असून, निवडणुकीच्या तोंडावर तगडा आणि सर्वमान्य म्हणून पुन्हा एकदा या पदाची धुरा विश्वास पाटील यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात लोकसभा, विधानसभेत पक्षीय राजकारण असले तरी, जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या ‘गोकुळ’मध्ये महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र आहे. ‘गोकुळ’वरील माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी आमदार पाटील यांनी पुढाकार घेतला, त्याला जिल्ह्यातील महाडिक विरोधकांनी साथ दिली. त्यातून सत्तांतर झाले, त्याचे श्रेय आमदार पाटील यांना जाते. त्यामुळेच ‘गोकुळ’च्या चाव्या कोणत्याही परिस्थितीत पाटील यांच्याकडे जाणार नाहीत, यासाठीच्या घडामोडी सुरू आहेत.
विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांची दोन वर्षांची ठरलेली मुदत २५ मे रोजी संपते. तत्पूर्वी म्हणजे १५ मे राजी झालेल्या संचालक मंडळात त्यांचा राजीनामा अपेक्षित होता. पण, त्याच्या आदल्या दिवशी डोंगळे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मात्र त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार तर दिलाच, पण महायुतीचा कोणीही अध्यक्ष करा, त्याला माझी सहमती असेल, असा पवित्रा घेतला. डोंगळे यांच्या या भूमिकेमुळे नेत्यांची पंचाईत झाली, तेव्हापासून डोंगळे हे नेत्यांच्याही संपर्कात नाहीत.
पुढील अध्यक्ष हा आमदार सतेज पाटील यांच्या गटाचा होणार होता. त्यासाठी ज्येष्ठ संचालक बाबासाहेब चौगले यांची प्रबळ दावेदारी होती; पण श्री. चौगले अध्यक्ष झाले तर संघावर काँग्रेसची व पर्यायाने सतेज पाटील यांची सत्ता आली, असा राजकीय संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच महायुतीचा अध्यक्ष करा, अशी टूम पुढे येत आहे. त्यातून पाटील यांना सत्तेपासून रोखणे आणि नवा अध्यक्ष महायुतीचा केला, हे राज्यपातळीवर जाणे हे महत्त्वाचे समजले जाते. ही घडामोड यशस्वी झाली तर नविद मुश्रीफ यांच्याकडे अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. मंत्री हसन मुश्रीफ हे सध्या महायुतीसोबत आहेत. त्यांच्याच मुलाला अध्यक्ष करून महायुतीचा अध्यक्ष केला, हे सांगता येणे सोपे आहे. त्याला डोंगळे यांचीही हरकत राहणार नाही, असे गणित यामागे आहे.
विश्वास पाटील यांना संधी शक्य‘गोकुळ’ची निवडणूक पुढील वर्षी आहे. निवडणुकीला सामोरे जाताना ताकदीचा अध्यक्ष असावा, असे सर्वसाधारण सूत्र आहे. मंत्री मुश्रीफ यांनीही महायुतीचाच अध्यक्ष करायचा झाल्यास आमच्याकडे डोंगळे यांच्यासह सर्वमान्य चेहरा असल्याचे आज सांगितले. त्यामुळे विश्वास पाटील यांना पुन्हा संधी शक्य आहे. पण, निवडणुकीनंतरच्या सुरुवातीच्या अडीच वर्षांसाठी डोंगळे यांनीच श्री. पाटील यांना विरोध केला होता. त्यामुळे ते पुन्हा या नावाला संमती देतील की नाही, याविषयी संभ्रमावस्था आहे. त्यांचा विरोध झाल्यास आणि मुश्रीफ यांनी मुलाला अध्यक्षपद नको, अशी भूमिका घेतल्यास अजित नरके यांनाही संधी आहे.