शिर्डी : १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर भारताच्या नवोत्थानाचा पाया या नात्याने भारतभर समाजाचे प्रबोधन, अध्यात्म तत्त्व आणि व्यवहार या मूलभूत घटकाचे ज्या ईश्वरीय योजनेने झाले, त्याचा एक भाग म्हणजे शिर्डीचे साईबाबा होत. देह त्यागानंतरही त्यांची तपस्या अनेकांना पथदर्शक ठरते, ही प्रचिती आहे.
अशा साईबाबांच्या समाधी मंदिराचा नित्य कार्ये विकास व त्याचे नित्य उत्तम व्यवस्थापन करणाऱ्या सर्व कार्यकर्ता मंडळींप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, असा अभिप्राय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांना नोंदवला. भागवत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर शेरेबुकात अभिप्राय नोंदवला.
सरसंचालक यांनी रविवारी (ता. १८) साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी उपस्थित होते.
दिल्लीवरून विमानाने दुपारी दाखल झाले. चार वाजता साईबाबा मंदिरात आले. त्यांच्यासमवेत उत्तर अहिल्यानगर संघचालक किशोर निर्मळ होते. ते येथून नाशिकला गेले. तेथे संघशिक्षा वर्ग सुरू आहे. त्यात मार्गदर्शन करणार आहेत. नाशिकला दोन दिवस मुक्कामी आहेत. ‘मी विद्यार्थीदशेपासून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत असल्याचेही त्यांनी सांगितले.