सोलापूर : अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील सेंट्रल इंडस्ट्रिज या टॉवेल कारखान्याला रविवारी (ता. १९) पहाटे चारच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. पहाटेच्या गाढ झोपेतील आठ जणांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. त्यात आगीमुळे बाहेर पडता न आल्याने पाच जण बेडरूममधील बाथरूममध्ये जाऊन बसले होते. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. १२ तासानंतर त्यांचे मृतदेह सापडले. आग आटोक्यात यायला १३ तास लागले, त्यासाठी अग्निशामकच्या ८२ गाड्या पाणी फवारावे लागले.
रविवारी पहाटे पावणेचार ते चारच्या सुमारास सेंट्रल टॉवेल कारखान्याला आग लागली होती. चारच्या सुमारास १०१ वरून कॉल आला आणि काहीवेळात अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी सुरवातीलाच अग्निशामकच्या जवानांनी खिडकी फोडून पाणी फवारायला सुरवात केली. यावेळी तीन कामगारांचे मृतदेह एका खोलीत सापडले. दुसरीकडे धूर, अंधारामुळे कारखाना मालकाच्या कुटुंबातील लोकांना बाहेर पडता आले नाही. त्यांच्या खोलीत मात्र आग पोचली होती. त्यामुळे सुरवातीला गुदमरून मृत्यू पावलेले पाच जण होरपळलेल्या स्थितीत आढळले. शेवटी सापडलेल्या पाच जणांचे मृतदेह तीन रुग्णवाहिकांमधून उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविले, त्यावेळी रुग्णालयात नातेवाइकांची मोठी गर्दी होती.
कारखान्याच्या आगीत ‘या’ आठ जणांचा मृत्यू
टॉवेल कारखान्याचे मालक उस्मान मन्सुरी (वय ७८) यांच्यासह नातू अनस मन्सुरी (वय २४), सून शिफा मन्सुरी (वय २३), पणतू युसूफ अनस मन्सुरी (१ वर्ष) यांचा समावेश आहे. याशिवाय कारखान्यातच राहायला असलेले कामगार मेहताब बागवान (वय ५१), आयेशा बागवान (वय ४५), हीना बागवान (वय ३५) व सलमान बागवान (वय १८) अशी मृतांची नावे आहेत.
---------------------------------------------------------------------
अग्निशामकचे २ जवान भाजले; गुदमरल्याने एकजण रुग्णालयात
टॉवेल कारखान्याला लागलेली आग आटोक्यात आणताना अग्निशामक दलाचे प्रमुख राकेश साळुंखे यांच्या हाताला भाजले आहे. फायरमन पंकज चौधरी यांनाही दोन-तीन ठिकाणी आगीने जखमा झाल्या आहेत. फायरमन समीर पाटील यांना आग आटोक्यात आणताना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
-----------------------------------------------------------------------
१२ तासांनी आग पुन्हा भडकली, अन्...
पहाटे चार ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. सगळे मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला नेल्यावर पाऊण तासांनी पुन्हा आग भडकली आणि आगीच्या ज्वाळा सगळीकडे दिसू लागल्या. कारखान्याची रचना खूपच गुंतागुंतीची होती. त्यामुळे अग्निशामकचे बंब दोन्ही बाजूंनी घुसून पाणी मारत होते. कारखान्याच्या समोरील दोन बाजू मशिनरीने पाडून आग विझविण्याचे काम करावे लागले. कारखान्याच्या भिंतीला लागूनच पाच-सात फुटावर विजेचा ट्रान्स्फॉर्मर होता.
----------------------------------------------------------------------------
बाहेर पडण्यासाठी धडपडणारे तिघे गुदमरले
टॉवेल कारखान्याला आग लागल्यानंतर त्याच ठिकाणी राहणाऱ्या बागवान कुटुंबातील तिघेजण खोलीतून बाहेर आले. खिडकीजवळ येत असताना धुरामुळे ते गुदमरले. तिघेही त्याच ठिकाणी खोलीत बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. आग त्यांच्या खोलीपर्यंत पोचली नव्हती, पण धुरामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
-----------------------------------------------------------------------
मृतांच्या कुटुंबास केंद्र-राज्याकडून मदत
महाराष्ट्रातील सोलापुरातील आगीच्या दुर्घटनेत जीवितहानीबद्दल दुखः झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याबद्दल संवेदना, जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. प्रत्येक मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वरून जाहीर केले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र कोठे यांनी देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------
आईच्या कुशीत होता एक वर्षाचा युसूफ
आगीच्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या उस्मान मन्सुरी यांच्या नातवाची सून शिफा यांचा युसूफ अवघ्या एक वर्षाचा होता. आग लागल्याने आता बाहेर पडू किंवा नाही, याची त्यांना खात्री नव्हती. आग आटोक्यात येईल आणि सगळेजण वाचावे म्हणून ते प्रार्थना करीत होते. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण कारखान्यात आग पसरली. घरातून बाहेर येण्याच्या मार्गावर टॉवेल व कच्चा माल होता. त्यालाच आग लागल्याने कोणालाच बाहेर पडणे शक्य नव्हते. शिफाने एक वर्षाचा युसूफ कुशीत घेतला, पण आग त्यांच्या बेडरूममध्ये व बाथरूमपर्यंत पोचली आणि पाचही जणांचा होरपळून मृत्यू झाला.
----------------------------------------------------------------------------------------
दोन कामगार, दोन वॉचमन वाचले
टॉवेल कारखान्यात काम करणारे दोन कामगार आग लागताच तेथून बाहेर पडले. तर दोन वॉचमन देखील आग लागल्यावर तेथून बाहेर पडले. काही क्षणात आग भडकल्याने बागवान कुटुंबातील सदस्यांना देखील मन्सुरी यांना बाहेर काढता आले नाही आणि स्वत:लाही बाहेर येता आले नाही. या आगीत कारखान्यातील संपूर्ण कच्चा व पक्का माल जळून खाक झाला आहे. कारखान्यातील घरावर केलेले टेनिस कोर्ट देखील जळाले आहे.