'सेबी'चा नवा गुंतवणूक पर्याय 'एसआयएफ'
esakal May 19, 2025 11:45 AM

दिनेश शेठ - चार्टर्ड अकाउंटंट-सीए

भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (एसआयएफ) अर्थात विशेष गुंतवणूक निधी हा एक अभिनव गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तो म्युच्युअल फंड आणि पीएमएस (पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा) यांच्यातील दरी भरून काढतो. ‘सेबी’कडे ‘एसआयएफ’साठी दोन म्युच्युअल फंड कंपन्यांकडून अर्ज आले आहेत. त्यांना लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा असून गुंतवणूकदारांना ‘एसआयएफ’मध्ये गुंतवणुकीची संधी मिळेल.

‘एसआयएफ’ म्हणजे काय?

पारंपरिक म्युच्युअल फंडापेक्षा जास्त लवचिकता आणि ‘पीएमएस’पेक्षा कमी गुंतवणूक मर्यादा देणारा हा पर्याय गुंतवणूकदारांना ‘पीएमएस’प्रमाणे प्रगत, सक्रिय गुंतवणूक धोरणांचा लाभ देतो आणि त्याचवेळी म्युच्युअल फंडासारखी नियामक सुरक्षा आणि पारदर्शकताही देतो.

‘एसआयएफ’साठी निकष

फक्त ‘सेबी’ नोंदणीकृत फंड कंपन्यांनाच ‘एसआयएफ’ सुरू करता येईल.

कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता मागील तीन वर्षांत किमान १० हजार कोटी असणे किंवा मुख्य गुंतवणूक अधिकाऱ्याकडे १० वर्षांचा अनुभव आणि किमान ५,००० कोटींच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनाचा अनुभव आवश्यक आहे.

गुंतवणुकीचे फायदे

  • प्रगत धोरणांचा लाभ : लॉंग-शॉर्ट, सेक्टर रोटेशन, मल्टी-ॲसेट अशा विविध प्रगत गुंतवणूक धोरणांचा वापर करता येतो.

  • विविधता : इक्विटी, डेट, डेरिव्हेटिव्ह अशा विविध मालमत्तांमध्ये गुंतवणूक करता येते, त्यामुळे पोर्टफोलिओ अधिक वैविध्यपूर्ण आणि संतुलित राहतो.

  • पारदर्शकता व नियमन : प्रत्येक महिन्याला माहिती जाहीर करण्याची सक्ती असते. ‘सेबी’च्या अशा कठोर नियमांमुळे गुंतवणूकदारांचे हित जपले जाते.

  • ‘एसआयपी’ सुविधा : सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनची (एसआयपी) सुविधा उपलब्ध आहेत, फक्त किमान गुंतवणूक मर्यादा पाळावी लागते.

जोखीम आणि मर्यादा

  • उच्च जोखीम : यात उच्च जोखीम आहे, कारण फंड मॅनेजरना जास्त स्वातंत्र्य असते आणि पोर्टफोलिओ सक्रियपणे बदलला जातो. डेरिव्हेटिव्हमध्ये २५ टक्क्यांपर्यंतचा निधी गुंतवण्याची मुभा असते.

  • किमान गुंतवणूक जास्त : किमान गुंतवणूक १० लाख रुपये असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी सहजसुलभ पर्याय ठरत नाही.

  • गुंतवणुकीची गुंतागुंत : धोरणे आणि मालमत्ता वर्ग गुंतागुंतीचे असू शकतात, त्यामुळे अनुभवी गुंतवणूकदारांसाठीच योग्य.

  • लिक्विडिटी : क्लोज-एंडेड किंवा इंटरव्हल फंडमध्ये पैसे लगेच काढता येतीलच, असे नाही.

कोणासाठी योग्य?

उच्च उत्पन्न गटातील अनुभवी गुंतवणूकदार, ज्यांना प्रगत गुंतवणूक धोरणांचा लाभ घ्यायचा आहे किंवा ज्यांना ‘पीएमएस’पेक्षा कमी रकमेत गुंतवणूक करायची आहे, ज्यांना पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण बनवायचा आहे, त्यांच्यासाठी ‘एसआयएफ’चा पर्याय अतिशय उपयुक्त आहे

वैशिष्ट्ये
  • गुंतवणूक : ‘एसआयएफ’मध्ये किमान १० लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक.

  • गुंतवणूक धोरणे : इक्विटी-ओरिएंटेड, डेट-ओरिएंटेड आणि हायब्रिड फंड अशी तीन मुख्य धोरणे असतात.

  • रचना : ओपन-एंडेड, क्लोज-एंडेड किंवा इंटरव्हल फंड स्वरूपात असू शकते.

  • लवचिकता : पोर्टफोलिओमध्ये फंड मॅनेजरना जास्त बदल करता येतात.

  • नियंत्रण व पारदर्शकता : ‘सेबी’ने ‘एसआयएफ’साठी स्पष्ट नियम व मर्यादा घातल्या आहेत. ‘एएए’ रेटेड डेट फंडांमध्ये २० टक्के गुंतवणूक, एकाच शेअरमध्ये कमाल १० टक्के आदी.

  • डेरिव्हेटिव्ह : ठराविक मर्यादांसह डेरिव्हेटिव्ह, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमध्येही गुंतवणूक करण्याची मुभा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.