महिला वैयक्तिक गुंतवणूक: आजच्या काळात आर्थिक स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता किती गरजेची आहे हे वेगळं सांगायला नको .आपल्या जोडीदारावर पालकांवर किंवा कुटुंबावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहावे ही कल्पनाच कालबाह्य झालीय . आर्थिक स्वातंत्र्यासाठी प्रत्येक स्त्रीने आर्थिकदृष्ट्या अवलंबित्वाचा मानसिकतेला बऱ्याच प्रमाणात छेद दिला आहे . मात्र अजूनही भारताच्या अनेक संस्कृतीमध्ये अजूनही ही रूढ कायम असल्याचे दिसते . आज कितीतरी स्त्रिया आपल्या व कमाईवर आपल्या भविष्यासाठी तरतूद करताना दिसतात .आर्थिक स्वातंत्र्य देणाऱ्या सुरक्षित गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या समोर आहेत .
SEBI ने 2024 मध्ये घेतलेल्या एका सर्वेक्षणानुसार केवळ 24 टक्के भारतीय स्त्रिया त्यांच्या बचतीतून गुंतवणूक करतात .पुरुषांमध्ये हा आकडा 46 टक्क्यांवर आहे . ही तफावत केवळ स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर मर्यादा घालते असे नाही तर संपत्ती निर्माण करण्याचे आणि भविष्य सुरक्षित करण्याचे मार्गही मर्यादित करते . गुंतवणुकीत स्त्रियांनी आपल्या आर्थिक नियोजनासाठी नेतृत्व करणं गरजेचं आहे .
गुंतवणूक केवळ पैसे वाढवण्यापुरती मर्यादित नसते, ती स्वतःच्या पैशावर नियंत्रण मिळवण्याचा मार्ग आहे. विवाहित असो, अविवाहित असो किंवा निवृत्त. आर्थिक स्वातंत्र्यामुळे स्त्रिया कोणतेही निर्णय आर्थिक बंधनांशिवाय घेऊ शकतात. S&P Global च्या अभ्यासानुसार, गुंतवणूक करणाऱ्या स्त्रिया केवळ बचतीवर अवलंबून असलेल्या स्त्रियांच्या तुलनेत 40% अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात . बचत महत्त्वाची आहेच, पण गुंतवणूक केल्याने पैसा वाढतो, महागाईवर मात होते आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण होते.
आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही अनपेक्षित घटनेवेळी आर्थिक चणचण निर्माण होते. अचानक नोकरी जाणे, वैद्यकीय आणीबाणी किंवा वैयक्तिक संकटे कोणालाही येऊ शकतात. गुंतवणूक ही अशा वेळी एक आर्थिक सुरक्षाकवच ठरते. उदाहरणार्थ: दर महिन्याला ₹5000 ची SIP (Systematic Investment Plan) 12% वार्षिक परताव्याने 10 वर्षांत ₹20 लाखांहून अधिक वाढू शकते. अशा प्रकारे नियमित गुंतवणूक केल्याने एक मजबूत आर्थिक आधार तयार होतो.
स्त्रिया सामान्यतः पुरुषांपेक्षा कमी कमावतात. जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी अधिक करिअर ब्रेक घेतात. पुरुषांच्या तुलनेत अधिक जीवनमान असल्याने भविष्याची तरतूद स्त्रीयांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पण तरीही त्या कमी गुंतवणूक करतात. यामुळे त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक असुरक्षितता वाढते. लहान वयापासून गुंतवणुकीला प्राधान्य दिल्यास स्त्रिया स्वतःसाठी संपत्ती निर्माण करू शकतात आणि निवृत्तीनंतरही सुरक्षित राहू शकतात, अगदी एकाच उत्पन्नावर चालणाऱ्या कुटुंबातही.
आर्थिक साक्षरतेचा अभाव: अनेक स्त्रिया गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करतात कारण त्यांना आर्थिक उत्पादनांची माहिती नसते. शाळांमध्ये वैयक्तिक आर्थिक शिक्षण दिले जात नाही आणि पारंपरिक मानसिकतेमुळे स्त्रियांना पैसे संबंधित गोष्टींपासून दूर ठेवले जाते.
उपाय: साध्या आर्थिक शिक्षणाने सुरुवात करा. NISM, SEBI चे गुंतवणूकदार जागरुकता कार्यक्रम आणि वैयक्तिक वित्त विषयक ब्लॉग्स हे उपयुक्त ठरतात. विश्वासार्ह आर्थिक सल्लागारांची मदत घ्या.
जोखमीची भीती: गुंतवणूक म्हणजे जोखीम, असे सामान्यतः मानले जाते. स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत अधिक जोखीम टाळणाऱ्या असतात. पण गुंतवणूक न करणे हीच सर्वात मोठी जोखीम आहे, कारण महागाईमुळे बचत झपाट्याने आपले मूल्य गमावते.
उपाय: लहान रकमेपासून सुरुवात करा आणि विविध साधनांमध्ये गुंतवा. म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि निश्चित उत्पन्न साधनांमध्ये गुंतवणूक केल्याने जोखीम नियंत्रित ठेवता येते आणि परतावाही मिळतो. SIP हे गुंतवणुकीसाठी एक चांगले माध्यम आहे.
अवलंबित्वाची मानसिकता: संस्कृतीमध्ये स्त्रियांना आर्थिक निर्णयांमध्ये दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याचे शिकवले जाते. या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी जागरुकता आणि सामाजिक पाठबळ आवश्यक आहे. गुंतवणूक ही केवळ श्रीमंत किंवा आर्थिकदृष्ट्या चाणाक्ष लोकांसाठी नसून, ती प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी आपले भविष्य सुरक्षित करू इच्छिते, संपत्ती निर्माण करू इच्छिते आणि खरेखुरे स्वातंत्र्य मिळवू इच्छिते.
हेही वाचा:
बँकेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी, पगार मिळणार 86000 रुपये, कसा कुठे कराल अर्ज? काय आहे पात्रता?
अधिक पाहा..