देर अल बाला : शांतता आणि शस्त्रसंधीसाठीचे सर्व प्रयत्न धुडकावून लावणाऱ्या इस्राईलने शनिवारी रात्री गाझा पट्टीत केलेल्या जोरदार हवाई हल्ल्यांमध्ये १३२ जणांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत.
गाझा पट्टीमध्ये इस्राईलने मागील आठवड्यापासून जोरदार हल्ले सुरू केले आहेत. या प्रदेशातील जीवितहानीबाबत ठोस माहिती मिळविण्याचे कोणतेही साधन नसल्याने येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या मृतदेह आणि जखमींच्या संख्येवरूनच हानीचा अंदाज काढावा लागत आहे. शनिवारी रात्री सुरू झालेला बाँबवर्षाव आज सकाळी थांबल्यानंतर येथील खान युनिस येथील रुग्णालयात ४८ मृतदेह आणण्यात आल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. मृतांमध्ये १८ बालके आणि १३ महिला होत्या. तसेच, गाझा पट्टीच्या उत्तर भागातही निर्वासितांच्या छावणीवर झालेल्या बाँबहल्ल्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. विविध ठिकाणी मिळून १३२ जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शस्त्रसंधी आापल्या अटींवरच व्हावी, यासाठी इस्राईल आग्रही असून हमासवर दबाव आणण्यासाठीच त्यांनी गाझा पट्टीवरील हल्ल्यांची तीव्रता वाढविली असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. हमासने सर्वच अपहृतांची तातडीने सुटका करावी, अशी इस्राईलची मागणी आहे. मात्र, इस्राईलने गाझा पट्टीतून सैन्य माघारी घ्यावे,अशी हमासची अट आहे.
दरम्यान, गाझा पट्टीतील इस्राईलचे हल्ले तातडीने थांबविण्याचे आवाहन अरब देशांनी आज केले आहे. अरब लीग परिषदेच्या निमित्ताने एकत्र आलेल्या अरब नेत्यांनी युद्ध थांबल्यानंतर गाझा पट्टीच्या पुनर्बांधणीत योगदान देण्याचेही आश्वासन दिले आहे.