Priyanka Senapati: युट्यूबर ज्योती मल्होत्रा हीला पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी नुकतीच अटक झाली, तिच्याकडं तपासातून काही धक्कादायक गोष्टी समोर येत असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. त्यातच आता आणखी एक युट्यूबर महिला अशाच हेरिगिरी प्रकरणात सहभागी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही महिला मैत्रिणी आहेत. दोघींचा पाकिस्तानात प्रवासही झाला आहे.
ओडिशातील पुरी येथील रहिवासी असलेली युट्यूबर प्रियंका सेनापती नामक युट्यूबर तरुणी सध्या चौकशीच्या फेऱ्यात आहे. ज्योती मल्होत्राची ती मैत्रिण असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या दोघींची मैत्री नेमकी कशा स्वरुपाची आहे, त्यांच्यात पाकिस्तानच्या हेरगिरीप्रकरणी काही देवाण-घेवाण झाली आहे का? याचा तपास केला जात आहे. पुरी शहराच्या डीएसपींच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या एका टीमनं प्रियांकाच्या घरी छापेमारी केली आहे.
प्रियंका सेनापती आणि ज्योती मल्होत्रा या दोघांमध्ये मैत्री आहे. त्याचा पुरावा म्हणजे सोशल मीडियावर या दोघींचे सोबत काढलेले अनेक फोटो आहेत. पहलगाममध्ये शूट केलेले या दोघींचे व्हिडिओ देखील चर्चेत आले आहेत. प्रियंकाचे वडील राजकिशोर सेनापती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, त्यांची मुलगी आणि ज्योती या मैत्रीणी आहेत. पण पोलिसांना चौकशीसाठी आपण पूर्ण सहकार्य करणार आहोत. त्याचबरोबर प्रियंकानं पाकिस्तानातील कर्तारपूरचा दौरा हा वैध व्हिसाद्वारे केला होता, अशी माहिती देखील तिच्या वडिलांनी दिली आहे.
तीन-चार महिन्यांपूर्वी माझी मुलगी कर्तारपूरला गेली होती, पण ती ज्योती मल्होत्रासोबत गेली नव्हती तर आपल्या इतर मित्रांसोबत गेली होती. माझ्या मुलीचा पाकिस्तानसाठीच्या हेरगिरी प्रकरणात कुठलाही हात नाही. तसंच ज्योती मल्होत्राच्या हेरगिरी प्रकरणाबाबतही आपल्याला काहीही माहिती नाही, असंही प्रियंका सेनापतीच्या वडिलांनी म्हटलं आहे.
युट्यूबच्या माध्यमातून ज्योतीच्या संपर्कात आलीदरम्यान, प्रियंका सेनापती हीनं सोशल मीडियावर एक स्पष्टीकरण देणारी पोस्ट केली आहे. यामध्ये तिनं म्हटलं की, मी कायम आपल्या देशाला प्राधान्य दिलं आहे. उलट मैत्रीण असलेल्या ज्योती मल्होत्रावर झालेल्या आरोपांना ऐकून आपणच आश्चर्यचकित झालो आहोत. मी कुठल्याही प्रकारच्या राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभागी नाही, अशी खात्रीही तिनं दिली आहे.
प्रियंकानं पुढे सांगितलं की, ज्योती माझी केवळ एक मैत्रीण होती, युट्यूबच्या माध्यमातून आम्ही संपर्कात आलो. जर मला आधीच माहिती असतं की, पाकिस्तानशी संबंधित हेरगिरीप्रकरणात तिचा हात आहे तर मी तिच्या संपर्कात आले नसते. जर माझी चौकशी होणार असेल तर मी यंत्रणेला पूर्णपणे मदत करायला तयार आहे.