डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा साई चौक परिसरात भाजी विक्री करणाऱ्या एका महिलेला मद्यपान करून आलेल्या एका व्यक्तीने "तू बांगलादेशी आहेस, पुरावे दाखव नाहीतर तुला इकडून हाकलून देईल," असे म्हणत भररस्त्यात शिवीगाळ केली. घाबरलेल्या महिलेने त्वरित खडकपाडा पोलिसांनी संपर्क केला मात्र वेळेत पोलीस न आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनीच सदर व्यक्तीला चोप दिला. त्या मद्यधुंद व्यक्तीने तेथून पळ काढला. गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली असून पोलीस तपास करत आहेत.
कल्याण पश्चिमेला साई चौक परिसरात गुरुवारी रात्री सदर महिला बाजारात भाजी विक्री करत होती. 9 च्या दरम्यान तेथे एक व्यक्ती आला त्याने मद्यपान केले होते. त्याने महिलेला तू बांगलादेशी आहेस, पुरावे दाखव नाहीतर तुला इकडून हाकलून देईल असे धमकावत शिवीगाळ सुरू केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे भाजी विक्रेती महिला घाबरून गेली. तिने तातडीने खडकपाडा पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. चार वेळा फोन केल्यावर पोलीस घटनास्थळी आले.
पोलीस घटनास्थळी येईपर्यंत तब्बल अर्धा तास उलटून गेला होता असे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या भररस्त्यात सुरु असलेल्या अश्लील वागणुकीमुळे भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचा संयम सुटला. त्यांनी त्या इसमाला पकडून चांगलाच चोप दिला. या सगळ्या गोंधळादरम्यान संबंधित इसमाने आपली दुचाकी घटनास्थळीच टाकून गर्दीची फायदा घेत तेथून पळ काढला. चार वेळा फोन करून पोलिस वेळेवर न पोहोचल्यामुळे महिलेने आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केला आहे.
सध्या या घटनेनंतर उशिरा पोहोचलेल्या पोलिसांनी महिलेला पोलीस ठाण्यात बोलवून तिची तक्रार ऐकून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, अशा घटनांमध्ये पोलिसांचा विलंब गंभीर स्वरूपाचा असून यावर त्वरित पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.