मुंबई-नाशिक महामार्गावरील आठवडा बाजारास नागरिकांचा विरोध
शेरेकर, चिंबीपाडा तरुणांकडून ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा निषेध
पडघा, ता. १९ (बातमीदार)ः भिवंडी तालुक्यातील पडघा गावाच्या हद्दीतील मुंबई-नाशिक महामार्गालगत भरणाऱ्या आठवडा बाजारास शेरेकर, चिंबीपाडा नागरिकांनी विरोध केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आठवडे बाजारास ग्रामपंचायतीने बंदी केली होती; परंतु पुन्हा त्याच ठिकाणी बाजार भरल्याने शेरेकर, चिंबीपाडा नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पडघा येथील रविवारच्या आठवडा बाजारासाठी आलेल्या दुकानदारांना गावात जागा मिळत नसल्याने अनेक दुकानदारांनी शेरेकर, चिंबीपाड्याकडे जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गालगत बाजार भरवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांना हायवे ओलांडताना आणि गावात ये-जा करण्यास त्रास होत आहे. याबाबत ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य महेश वावरे यांनी पडघा ग्रामपंचायत कार्यालयात लेखी निवेदन दिले, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान, या बाजाराविरोधात सामाजिक संस्थांनी आवाज उठविला. तसेच त्याबाबत वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होताच पडघा ग्रामपंचायतीतर्फे कारवाईचे फलक लावून जबाबदारी झटकण्यात आली. दरम्यान, कारवाईला न जुमानता आठवडा बाजार रविवारी (१८ मे) पुन्हा त्याच ठिकाणी भरवण्यात आला. बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी वाहने पार्किंग केल्याचे शेरेकर, चिंबीपाडा येथील तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी एकत्र येत येथील दुकानदार व वाहनचालकांना जाण्यास सांगितले. या वेळी पडघा ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त केला. तसेच महामार्ग ओलांडताना एखाद्या ग्रामस्थाचा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी व्यक्त या वेळी केला.
पडघा ग्रामपंचायतीच्या कारवाईचे फलक दुकानदाराना दाखवताना शेरेकर, चिंबीपाडा येथील संतप्त तरुण.