- rat१९p१९.jpg-
२५N६४८३७
रत्नागिरी ः विंध्यवासिनी देवी
- rat१९p२०.jpg-
२५N६४८३८
प्रज्ञा इंगवले-कळसकर आणि गणेश कळसकर.
---
मालिका भाग - १
कोकणच्या मानबिंदूचे जतन-------लोगो
चिपळुणातील वस्तुसंग्रहालयाची मांडणी हे आव्हान
प्रज्ञा इंगवले-कळसकर ः पुढील वाटचाल हौसेपलीकडचीच
शिरीष दामले ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : कोकणचा सांस्कृतिक मानबिंदू असलेले चिपळूण येथील वस्तुसंग्रहालय पुनश्च हरिओम् या पद्धतीने पुन्हा रसिकांसाठी खुले झाले आहे; मात्र आता या वस्तुसंग्रहालयाचे व्यवस्थापन व्यावसायिक पद्धतीने करण्याची गरज आहे. प्रकाश देशपांडे आणि त्यांचे सहकारी यांच्यासारखे तळमळीचे हौशी आणि त्यांनी उपसलेले अपार कष्ट यामुळे हे संग्रहालय उभे राहिले असले, तरीही यानंतरची वाटचाल हौसेखातर करून चालणार नाही. संग्रहालयातील वस्तूंचे जतन, त्याची मांडणी, वस्तू जमवणे या सगळ्यात आखीवरेखीवपणा आणि सौंदर्यदृष्टी आणण्याची गरज लक्षात घेऊन या संग्रहालयाची नव्याने मांडणी करण्यात आली. चिपळूणची कन्या प्रज्ञा इंगवले-कळसकर आणि चित्रकार गणेश कळसकर यांनी सहकाऱ्यांसह वस्तुसंग्रहालयाची मांडणी केली आहे.
वस्तुसंग्रहालयात संमिश्र वस्तू आहेत. त्या एकाच पद्धतीच्या वा प्रकारच्या वस्तू नाहीत. त्यामुळे त्याचे वर्गीकरण करावे लागले. कोकण हा थीम असला तरी सर्व वस्तू एकाच थीममध्ये बसवणे कठीण होते, असे सांगून प्रज्ञा म्हणाल्या, कोकण संस्कृती, मराठाकालीन शस्त्रे, अश्मयुगीन हत्यारे, शस्त्रे, तत्कालीन संस्कृती दर्शवणाऱ्या दगडी, धातूच्या मूर्ती, घरातील देव्हारे असे ढोबळ वर्गीकरण केले आहे. या जोडीला काही दस्तावेज आहेत. वस्तुसंग्रहालयात शिरतानाच विंध्यवासिनीची अत्यंत प्रसन्न आणि प्रभाव टाकणारी मूर्ती आहे. ही मूर्ती मूर्तिकलेतील अप्रतिम नमुना मानली जाते. पुरातत्त्व मूल्याच्यादृष्टीनेही ही मूर्ती महत्त्वाची आहे. चिपळूणवर आपली कृपा ठेवणारी म्हणून दर्शनीच विंध्यवासिनी आहे. वा. म. मिराशी यांच्यासह अनेक अभ्यासकांनी या मूर्तींवर लिहिले आहे. त्यानंतर वर उल्लेख केलेली शस्त्रे आदी पाहायला मिळतात. कोकण असे वेगळे दालन करण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणी जीवन, स्वयंपाकघरातील भांडी, मापटी, कचेरीतील वातावरण, जुन्या काळी पेढ्या असत. तेथील दिवाणजी यांसह सण, संस्कृती याची माहिती होईल अशी मांडणी करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रज्ञा यांनी सांगितले.
---
कार्तिकस्वामीही विराजमान होणार
विंध्यवासिनीसह त्याच देवळात असलेल्या कार्तिक स्वामींची प्रतिकृतीही तेवढ्याच भव्य स्वरूपात या संग्रहालयात उभारण्यात येणार आहे. तेथील कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यावर मर्यादा होत्या वा असतात. त्याला अनेक श्रद्धा आड येतात किंवा कारणीभूत असतात. संग्रहालयाच्या दर्शनी विंध्यवासिनीसह कार्तिकस्वामी तेथे उभे राहिले तर देवळात गेल्यासारखेच वाटेल. कार्तिकस्वामींच्या या मूर्तीबाबत सुप्रसिद्ध मूर्तितज्ञ देगलूरकर यांच्या सारख्यांनीही लिहिले आहे. त्यातील श्रद्धा-अंधश्रद्धा बाजूला ठेवून इतक्या दुर्मिळ वस्तू आपल्याकडे आहेत याची माहिती ही मूर्ती इथे ठेवल्यानंतर संग्रहालयात शिरता शिरताच होईल, अशी माहिती प्रकाश देशपांडे यांनी दिली.
----