तुर्भे, ता. १९ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून एपीएमसी सेक्टर १९ ई येथील जुन्या आरटीओ कार्यालयासमोर पाम बीच मार्गावर जाण्यासाठी जोडरस्ता सुरू केला होता. या रस्त्याचे जवळपास ११ महिन्यांपासून बंद असलेले काम अखेर आता सुरू झाले असून, येत्या आठवडाभरात काम पूर्ण होऊन रस्ता नागरिकांसाठी खुला होणार आहे.
पाम बीच मार्गावर जाणारा जोडरस्ता फेब्रुवारी २०२४ मध्ये तयार होऊनदेखील तो वाहतुकीसाठी खुला केला गेला जात नव्हता. याविरोधात ठाकरे गटाचे नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख संकेत डोके यांच्या नेतृत्वाखाली २४ जून २०२४ला या रस्त्यावर आंदोलन केले होते. त्या वेळी येत्या दोन दिवसांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर वारंवार प्रशासनाकडे रस्ता खुला करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता; मात्र जवळपास अकरा महिन्यांनंतर प्रशासनाने रखडलेल्या कामाला सोमवारी (ता. १९) सुरुवात केली असून, येत्या आठवड्यात रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
---------------------------
कंत्राटदारामुळे रस्त्याची अडवणूक
एपीएमसी परिसरातील नागरिकांना सहजरित्या पाम बीच मार्गावर जाता यावे, या उद्देशाने जुन्या आरटीओ कार्यालयासमोरील नाल्याला समांतर असा रस्ता तयार केला आहे. रस्ता तयार होऊनही त्यावर संबंधित कंत्राटदाराने बांधकाम साहित्य ठेवून त्याच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी पत्र्याचे कुंपण घातले आहे. केवळ कंत्राटदाराच्या फायद्यासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला नसल्याचा आरोप डोके यांनी केला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची वेळोवेळी भेट घेत ही समस्या प्रशासनाकडे मांडली होता. अखेर पालिकेकडून याची दखल घेत रस्त्याच्या उर्वरित कामाला सुरुवात करण्यात आली.