सद्गुरू - ईशा फाउंडेशन
तुमचे व्यक्तिमत्त्व हे आवड आणि नावड यांची एक जटिल प्रणाली आहे. ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे मूलभूत आधार, त्याचे पायाभूत घटक आहेत. तरीही, आवड आणि नावड यांच्यासहित जगामध्ये अस्तित्वात राहण्याचा प्रकार अतिशय मूर्खपणाचा आहे. कृपया याकडे काळजीपूर्वक पाहा - तुमच्या बंधनाचा मूलभूत पाया आवड आणि नावड यावर आहे. परंतु दुर्दैवाने, तार्किक मन तुम्हाला असा विश्वास ठेवायला लावते, की तुम्हाला आवडणारी गोष्ट करणे हेच तुमचे स्वातंत्र्य आहे. भौतिक जगात वावरतानाही, तुमच्या कामात किंवा कुटुंबातही - आवड आणि नावड तुम्हाला मूर्खपणाच्या गोष्टी करायला लावतात. तुम्हाला कोणी आवडत नसेल, तर ती व्यक्ती जरी काही चांगले करत असली, तरी तुम्ही ते पाहणार नाही. तुम्हाला कोणी आवडत असेल, जरी ते वाईट गोष्टी करत असले तरीही तुम्ही ते पाहू शकत नाही. हे असे घडते, कारण ज्याक्षणी तुम्ही आवड आणि नावड यांच्यामध्ये अडकता, तुम्ही स्वतःचा विवेक गमावता; तुमची बुद्धिमत्ता सोडून दिली जाते. त्या क्षणी काय आवश्यक आहे त्यानुसार तुम्ही काम करू शकत नाही. एकदा का तुम्ही आवड आणि नावड यामध्ये अडकलात, की तुमची जागरूकता पूर्णपणे अशक्य बनते.
योगाचा मूलभूत आधार आवड आणि नावड यांची प्रक्रिया नष्ट करणे आणि त्यांच्या पलीकडे जाण्यासाठी तुम्हाला मदत करणे हा आहे. त्यानंतर, तुमच्या आसपास गोष्टी असणे आणि अगदी त्या मिळवणे - ज्या तुम्हाला हव्या आहेत - हे कोणत्याही प्रबळ आवड आणि नावड यांच्याशिवाय घडू शकतात. तुम्ही स्वतःचे जीवन अशा पद्धतीने हाताळू शकलात, जिथे तुम्ही फक्त तुमच्याकडे असलेल्या गोष्टींचा आनंद घेता आणि कोणतीही आवड आसक्तीपूर्ण नसते, तेव्हा तुम्ही तुमच्या आवड आणि नावड यांमध्ये अडकत नाही. तुमच्या आजूबाजूला संपूर्ण जग आणि जगातली संपत्ती असू शकते आणि तुम्ही तिचा पूर्णपणे आनंद घेऊ शकता, परंतु उद्या सकाळी ते नाहीसे झाले, तरी काही फरक पडणार नाही - कारण तुमचे त्यासोबत आवडीचे बंधन नाही - जेव्हा ते असते तेव्हा तुम्ही त्याचा आनंद घेता, बस एवढेच.
हे तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूपर्यंत विस्तारले जावे, तुमच्या शरीरासहित. शरीराबाबत आवड आणि ओळख यांची जाणीव अतिशय सखोल असते. तुम्हाला जे आवडत नाही त्यासोबत तुम्ही स्वतःला जोडू शकत नाही. म्हणून, तुम्ही आवड आणि नावड प्रक्रियेपासून मुक्त झालात, तर तुम्हाला दिसेल, की तुम्ही स्वतःच्या शरीराला दररोज फिरायला नेऊ शकता, परंतु तुम्ही ते नाही. हा तुमच्यासाठी सहजभाव बनेल. जेव्हा तुम्ही शरीराला चिकटून राहत नाही, तेव्हा तुमचे इथले आणि पलीकडचे जीवन यापुढे समस्या राहत नाही. ते आपोआप हाताळले जाते.