महाड, ता. २० (बातमीदार) : महाड औद्योगिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील पाचवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाचा निषेध करण्यासाठी व त्याला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी तालुक्यातील नागरिकांनी सोमवारी (ता. १९) महाडमध्ये निषेध मोर्चा काढला.
पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत प्रांत कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. १४ मे रोजी शहरातील सलूनमध्ये विलास पांडुरंग हुलालकर (४८) याने पाचवर्षीय बालिकेवर खाऊचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. पोलिसांकडून आरोपीला अटकदेखील केली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद नागरिकांमध्ये उमटले असून, सोमवारी सकाळी तालुक्यातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाल्या होत्या. त्यानंतर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
खटला जलद न्यायालयात
कोणत्याही परिस्थितीत आरोपीला पाठीशी घालणार नाही. सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, खटला जलद न्यायालयात चालवण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया केली जाईल. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन महाड पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी मोर्चेकऱ्यांना दिले.
..........
फोटो - निषेधार्थ काढण्यात आलेला मोर्चा