टार्गेट प्रॅक्टिससाठी वापर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डीआरडीओ स्वत:च्या स्टार क्षेपणास्त्र प्रकल्पाला तिसऱ्या टप्प्यात नेण्यास यशस्वी ठरली आहे. या टप्प्यात क्षेपणास्त्राला पूर्णपणे तयार करत अनेकदा उड्डाण परीक्षण करण्यात येत आहेत. स्टार क्षेपणास्त्र एक स्वदेशी क्षेपणास्त्र असून ते वायुदल, भूदल आणि नौदलासाठी वेगयुक्त धोक्यांची नक्कल करते, म्हणजेच टार्गेट प्रॅक्टिस करू शकते. हे क्षेपणास्त्र स्वस्त असण्यासोबत ब्राह्मोससारख्या क्षेपणास्त्रांकरता पर्यायही ठरू शकते.
तिसऱ्या टप्प्यात डीआरडीओचे इंजिनियर्स क्षेपणास्त्राचे सर्व हिस्से, म्हणजेच इंजिन, नेव्हिगेशन सिस्टीम आणि नियंत्रण प्रणालीला एकत्र जोडून पूर्ण क्षेपणास्त्र तयार करतात, मग याला युद्धसरावाकरता अनेकदा डागले जाते, या परीक्षणांमधून क्षेपणास्त्र किती अचूक, विश्वसनीय आणि प्रभावी आहे हे कळते.
परीक्षणातून मिळालेल्या माहितीद्वारे क्षेपणास्त्रात सुधारणा केली जाते, जेणेकरून सैन्याच्या गरजा पूर्ण होऊ शकतील. डीआरडीओ वेगवेगळे ऋतू आणि परिस्थितींमध्ये क्षेपणास्त्राचे परीक्षण करत आहे. क्षेपणास्त्र जमीन आणि हवाई उपकरणांसोबत योग्यप्रकारे काम करू शकते की नाही, हे देखील पडताळले जात आहे. जर हे परीक्षण यशस्वी ठरले तर डीआरडीओ क्षेपणास्त्राचे मर्यादित उत्पादन सुरू करू शकते. ज्याचा सैन्य प्रशिक्षण आणि पुढील परीक्षणांसाठी वापर केला जाणार आहे.
ब्राह्मोससारखा वापर
स्टार क्षेपणास्त्राला आधुनिक क्षेपणास्त्रांप्रमाणे वेगाने उ•ाण आणि त्यांची नक्कल करता येईल अशाप्रकारे निर्माण करण्यात आले आहे. हे 2.5 मॅक (सुमारे 3062 किमी/तास)पेक्षा अधिक वेगाने उडू शकते. हे वेगाने दिशा बदलू शकते, उंची कमी अधिक करू शकते, हे प्रशिक्षण सैनिकांना खऱ्या युद्धात वेगाने निर्णय घेणे आणि योग्य प्रतिक्रिया देण्यासाठी तयार करते.
सर्वठिकाणी वापरता येणार
स्टार क्षेपणास्त्राचे डिझाइन हे वेगवेगळ्या मोहिमा आणि गरजेनुसार याला सहजपणे बदलता येऊ शकेल अशाप्रकारचे आहे. हे वायुदल, भूदल आणि नौदलासाठी उपयुक्त ठरेल. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने ‘बंशी टार्गेट’ ड्रोन्सना डिकॉय म्हणून वापरले होते. स्टार क्षेपणास्त्र अशाप्रकारच्या कामांमध्ये आणखी उपयुक्त ठरू शकते.
हवाई क्षेपणास्त्र : अधिक पोहोच
डीआरडीओ स्टारचे एक असे वर्जन तयार करत आहे, जे तेजससारख्या लढाऊ विमानातून डागले जाऊ शकते. हे आकाशातून आकाशात आणि आकाशातून जमिनीवर मारा करण्यास मदत करेल. हे क्षेपणास्त्र शत्रूचा रडार किंवा अॅवॅक्सला नष्ट करण्याच्या सरावातही उपयुक्त आहे.
भूदलासाठीचे क्षेपणास्त्र
स्टार क्षेपणास्त्र जमिनीवरूनही डागता येते. याकरता बुस्टर जोडले जातात, ज्यामुळे हे दूरपर्यंत उडू शकते. याला वाहने तसेच स्थिर प्लॅटफॉर्मवरून डागता येऊ शकते. हे जमिनीवरून जमिनीवर किंवा किनाऱ्यावरून जहाजावर हल्ला करण्याच्या सरावात मदत करणारे ठरेल. याला प्रतिकूल ठिकाणी देखील वापरता येऊ शकते.
रॅमजेट इंजिन
क्षेपणास्त्रात लिक्विड फ्यूल रॅमजेट इंजिन आहे. हे इंजिन हवेतून ऑक्सिजन मिळविते, यामुळे क्षेपणास्त्राला कमी इंधन वाहून न्यावे लागते, यामुळे क्षेपणास्त्राचे वजन कमी होते, दीर्घकाळापर्यंत वेगाने उडू शकते.
भविष्यातील क्षेपणास्त्रांसाठी सहाय्यभूत
स्टार क्षेपणास्त्र केवळ प्रशिक्षणासाठी नाही, हे डीआरडीओच्या रॅमजेट इंजिन आणि नव्या क्षेपणास्त्रांसाठी एक टेस्टिंग प्लॅटफॉर्म देखील आहे. यावर आजमाविण्यात आलेले तंत्रज्ञान अॅवॅक्स किलर, अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र आणि स्वस्त क्रूज क्षेपणास्त्र यासारख्या प्रकल्पांमध्ये मदत करेल. यामुळे नवी क्षेपणास्त्र निर्माण करण्यासाठी लागणारा कालावधी आणि जोखीम कमी होईल.
स्टार क्षेपणास्त्राच्या खास बाबी
►वेग : 1.8 ते 2.8 मॅक
►उंची गाठणार : 100 मीटर ते 10 किलोमीटरपर्यंत
►पल्ला : 55 ते 175 किलोमीटरपर्यंत
► उड्डाण कालावधी : 50 ते 200 सेकंद