आयपीएल 2025 मध्ये प्लेऑफसाठी 4 पैकी 3 संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स या 3 संघांनी प्लेऑफच तिकीट मिळवलं आहे. तर आता प्लेऑफसाठी एक जागा रिक्त आहे. या एका जागेसाठी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात कडवी झुंज आहे. उभयसंघात आज 21 मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. हवामान खात्याकडून मुंबईला 4 दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणता संघ प्लेऑफमध्ये पोहचेल? हे सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्से 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर 5 वेळा पराभव झाला आहे. मुंबईच्या खात्यात 14 गुण आहेत. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबई इतकेच 12 सामने खेळले आहेत. मात्र दिल्लीला केवळ 6 सामन्यांमध्ये विजयी होता आलं आहे. तर दिल्लीचा 5 सामन्यांमध्ये पराभव झाला. तसेच 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.त्यामुळे दिल्ली 13 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. अशात आता मुंबई विरुद्ध दिल्ली सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट दिला जाईल. त्यानंतर मुंबईच्या खात्यात 15 आणि दिल्लीच्या खात्यात 14 पॉइंट्स होतील. त्यानंतर दोन्ही संघांसाठी त्यांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना निर्णायक ठरेल.
मुंबई आणि दिल्ली दोन्ही संघांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध होणार आहेत. मुंबई विरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी पंजाब विरुद्ध कोणत्याही स्थितीत जिंकावं लागेल. तसेच मुंबईचा पंजाब विरुद्ध पराभव झालाच तर दिल्लीला प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे दिल्लीसाठी पंजाब विरूद्धच्या विजयासह नशिबाची साथ असणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला मुंबई विरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर दिल्ली पंजाब विरुद्ध पराभूत झाली तर पलटण थेट प्लेऑफसाठी क्वालिफाय होईल. तसेच पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांनी पंजाबला पराभूत केलं. तर त्यानंतर मुंबईचे17 आणि दिल्लीचे 16 पॉइंट्स होतील. त्यामुळे तशा परिस्थितीतही दिल्लीचं पॅकअप होईल.
तसेच दिल्लीवर विजय मिळवला तर मुंबई थेट प्लेऑफसाठी क्वालिफाय करेल.त्यामुळे मुंबईसाठी पंजाब विरुद्धचा सामना निर्णायक ठरणार नाही. तर दिल्लीने मुंबईला पराभूत केलं तर त्यांची प्लेऑफची आशा कायम राहिल. मात्र त्यानंतर दिल्लीसमोर पंजाबला पराभूत करण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल तर मुंबईचा पराभव होणं बंधनकारक आहे.