गायक आदर्श शिंदे भर संगीताच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे स्वागत करत होता. आधी छगन भुजबळांचं स्वागत केलं. त्यांच्या बाजूला समीर भुजबळ बसले होते. त्यांचे स्वागत करून माजी मंत्री नवाब मलिक यांचं स्वागत केलं. यावेळी नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार बाजूला बसल्याचे सांगितले. त्यानंतर दादा सॉरी, तुम्हाला पाहिलंच नाही, असं आदर्श शिंदेने म्हणत अजित पवारांचंही स्वागत केलं. खेळीमेळीच्या वातावरणात हा सुसंवाद सुरु होता. आदर्श शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा संवादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
कलाकार आणि राजकीय नेत्यांचा कार्यक्रमानिमित्त गाठीभेटी होत राहतात. अनेक राजकीय नेते कलाकारांना प्लॅटफॉर्म देत असतात. मनोरंजनाचा कार्यक्रम म्हटलं तर कलाकार राजकीय नेत्यांशी मनमोकळेपणांने गप्पा मारत असतात. राजकीय नेते आणि कलाकार दोघेही एकमेकांशी सलोख्याचे संबंध ठेवून असतात. असाच एक कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आला होता. मुंबईच्या बांद्रा येथे राष्ट्रवादीकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता महोत्सव २०२५ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील गायक आणि राष्ट्रवादीच्या नेत्याचा संवाद सध्या चर्चेत आला आहे.
नेमकं काय घडलं?भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता महोत्सव २०२५ मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आदर्श शिंदेला गायनासाठी बोलावलं होतं. या कार्यक्रमात आदर्श शिंदे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे स्वागत करत होता. राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांचे स्वागत करत असताना आदर्श शिंदे अजित पवारांचं नाव घेणे राहून गेलं. नवाब मलिकांनी उपमुख्यमंत्री देखील कार्यक्रमाला आल्याचे सांगितल्यानंतर आदर्श शिंदेने भरकार्यक्रमात सॉरी बोलत माफी मागितली.
आदर्श शिंदे नेमकं काय म्हणाला?'वंदामी भंते. सर्व मंडळी बघून आनंद झाला. छगन भुजबळ सर, आमचे मोठे बंधू समीर भुजबळ, सिद्धार्थ कांबळे. सर्वात आधी सिद्धार्थ कांबळे यांच्या टीमसाठी टाळ्या वाजवुयात. त्यांची टीमने गेल्या दीड-दोन महिन्यांपासून मेहनत घेतली. नवाब मलिक देखील आले आहेत. त्यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवुयात. अरे व्वा...दादा पण आले आहेत. अजितदादांना मी पाहिलंच नाही. मी आतमध्ये होतो. मला कळलंच नाही की, सर्व जण आले आहेत, असं आदर्श शिंदे म्हणाला. खेळीमेळीत हा गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.