पुणे - मॉन्सूनपूर्व पावसाने राज्यातील अनेक भागांत दाणादाण उडाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, खानदेश, मराठवाडा व विदर्भात हलका ते जोरदार पाऊस पडला.
तर पुण्यात मुसळधार पाऊस झाला. खरिपाच्या तोंडावर झालेला पाऊस पोषक असला, तरी पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सततच्या पावसाने काही ठिकाणी बाजरी, भुईमूग, मका पिकांना कोंब फुटू लागले आहेत.
राज्यात मंगळवारी रात्री आठनंतर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पावसाने अनेक जिल्ह्याला झोडपले. काही भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून, बुधवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत चिंचवड येथे १०१ मिलिमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली.
अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील रस्ते पाण्याखाली गेले. तर ग्रामीण भागात पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाने दाणादाण उडाली. वीज पडून कुडाळ येथील एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनदेखील रिपरिप सुरू होती.
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर तर खानदेशातील धुळे, जळगाव जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. कोल्हापूरला पूर्व मोसमी पावसाने झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्याच्या बहुतांश भागांत पाऊस सुरूच होता. जोरदार पावसाने खरीप तयारीला ब्रेक लागला आहे.
अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून राहिल्याने वाफशासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. बहुतांश तालुक्यांतून पाऊस झाला असून, यामुळे सुमारे शंभर हेक्टरमधील काढणीला आलेली उन्हाळी पिके शेतात अडकली आहेत.
सांगलीतील दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यांना झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. शिराळा तालुक्यात दीड तासांहून अधिक पाऊस झाला. हा पाऊस खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी उपयुक्त ठरणार असून पूर्वमशागती खोळंबल्या आहेत. अनेक गावांतील शेतात पाणी साचले.
सातारा जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत तिसऱ्या दिवशी बुधवारी जोरदार पाऊस सुरू होता. या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत. अहिल्यानगरमधील अनेक तालुक्यांतही पावसाने कांदा, मका, आंबा, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे.
खानदेशात रोज वादळी पाऊस पडत आहे. मंगळवारी विविध भागांत वादळी पावसात पिकांसह घरे, गोठ्यांचे नुकसान झाले. धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा भागांत पाऊस झाला. साक्री तालुक्यातील वार्सा, पिंपळनेर भागांत पावसाने हजेरी लावली. अनेक भागांत विजेचे खांबही वाकले आहेत.
मराठवाड्यात पिकांचे मोठे नुकसान
काही दिवसांपासून मराठवाड्यात मॉन्सूनपूर्व पाऊस पडत आहे. या पावसामुळे सुमारे ४२१८ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. याआधी मे महिन्यातच सुमारे अडीच हजार हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल प्रशासनाकडून देण्यात आला.
२०२५ मध्ये अवेळी पावसामुळे ५९७ गावांतील ७१४६ शेतकऱ्यांचे सुमारे २४१८.५४ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. यात जिरायत २५१.०८ हेक्टर, बागायत १८८४.७२ हेक्टर, तर फळपिकांचे सुमारे २०८२.७४ क्षेत्रांवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
राज्यातील नुकसान
1) पुण्यात मॉन्सूनपूर्व ढगफुटीसदृश पाऊस
2) चिंचवडमध्ये १०१ मिलिमीटर पावसाची नोंद
3) कांदा, आंबा, काजू, केळी, भुईमूग, बाजरी, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान
4) पंचनामे करण्याची मागणी
5) कोल्हापुरात काही ठिकाणी पाऊस
6) पावसाने वाशीम जिल्ह्यात भुईमुगाला निघाले कोंब.
7) मराठवाड्यात पावसाने ३९१ जनावरे दगावली
वीज कोसळून चार जनावरे ठार
कापडणे (नाशिक) - बोरी पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या विजांचा कडकडाट व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बोरकुंड व मोरदड तांड्यात वीज पडून चार जनावरे मृत्युमुखी पडली. यामुळे शेतकरी कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. बोरकुंड (ता. धुळे) येथे सोमवारी रात्री वादळी, वारा व पाऊस झाला.
जयवंत साहेबराव भदाणे यांची म्हैस वीज पडून ठार झाली. शिरूड परिसरात पूर्वमोसमी पावसाने कहर केला आहे. मोरदड तांडा (ता. धुळे) येथील शेतकरी भिवसन बापू पवार यांच्या दोन गाई आणि बैल वीज कोसळून ठार झाले. यामुळे एक लाख पंचवीस हजारांचे नुकसान झाले. दरम्यान, वीज कोसळून जनावरे दगावल्याच्या घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्यास आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सरपंच रंजना चव्हाण व उपसरपंच नवल पवार यांनी महसूल विभागाकडे केली आहे.