मी आणि कार्बन आमच्या व्हरांड्यामध्ये निसर्गाचा तो खेळ किती वेळ बघत बसलो होतो आठवत नाही; पण अचानक एका क्षणी पाऊस पूर्णपणे थांबला. असा थांबला, की जणू कधी पडलाच नव्हता. करून - सावरून नामनिराळं राहणंसुद्धा निसर्गाकडून शिकावं!
पावसाचा आवाज थांबल्याक्षणी रातकिड्यांनी गायला सुरुवात केली. कार्बन ओला गच्च झाला होता. सवयीप्रमाणे तो माझ्याजवळ आला आणि त्यानं अंग झाडलं. इतका वेळ बाहेरच्या पावसापासून मी वाचले होते, कार्बनने ओलं करून टाकलं. आमच्या दोघांचं अंग पुसून मी आकाशाकडे बघत उभी राहिले. आभाळामध्ये चंद्राची बारीक कोर उमटली होती आणि शेतामध्ये समोरची चार झाडं काजव्यांनी पेटली होती.
विलंबित लयीमध्ये एखादा ताल चालावा आणि त्याच्यावर ‘कथक’मध्ये सुरुवातीला जसा ‘थाट’ करतात - तसं काजव्यांचं चमकणं सुरू होतं. धा धिं धिं धा.. प्रत्येक काजवा लयीत अचूक होता, प्रत्येक जण समेवर येत होता... निसर्गामध्ये लय सूर असतातच, ते आपण जेव्हा ओळखतो तेव्हा संगीत बनतं.
त्या काजव्यांच्या झाडांमध्ये आणि माझ्यामध्ये असलेलं अंतर मला फार जास्त वाटायला लागलं. कुठल्यातरी अनामिक ओढीनं मी त्या रात्रीच्या अंधारामध्ये, खालच्या वावरात जायला निघाले. शेतावर आमचं घर सोडून इतरत्र कुठंही पायऱ्या बांधलेल्या नाहीयेत.
वरच्या वावरातून खाली जाताना- खाली उतरताना पडू नये म्हणून करायला लागेल, तेवढीच वाट केलेली आहे. अंधारात चालायची मला भीती वाटत नव्हती- कारण त्या वाटासुद्धा आम्ही स्वतःच्या हातानं केल्या आहेत. प्रत्येक पावलाला कुठला दगड लागू शकतो हेसुद्धा आता आम्हाला माहिती आहे.
कार्बनला माझ्याबरोबर खाली यायचं होतं; पण त्याला घरामध्ये कोंडलं. संध्याकाळ झाली, की त्या दोघांनाही बाहेर फिरायला बंदी आहे. काहीच आठवड्यांपूर्वी, आमच्या गेटवर, जवळजवळ तासभर एक बिबट्या विश्रांती घेत बसून राहिला होता. आमच्या सीसीटीव्हीमार्फत त्याचं दर्शन झाल्यावर अंधार पडल्यावर कार्बन आणि हनिवा घरात असतील हा नियम केला गेला.
रात्रीच्या अंधारामध्ये त्या नखाएवढ्या चंद्रकोरीच्या प्रकाशात मी आमच्या उंबराच्या झाडाकडे जायला निघाले.. आजूबाजूला माणसं राहत नाहीत याचा एवढा आनंद त्या आधी मला कधीच झाला नव्हता. कारण माणूस आला म्हणजे दिवे आले आणि दिवे आले म्हणजे काजवे गेले... निसर्ग बघायला निसर्गामधलंच लायटिंग पाहिजे - चंद्रकोरीसारखं. हॅलोजनच्या प्रकाशात जे दिसायला पाहिजे, तेच लपलं जातं...
मी त्या काजव्यांनी लगडलेल्या झाडाखाली उभी राहिले. माझ्या आजूबाजूला, माझ्या अंगाखांद्यांवर काजवे होते. जणू काही मी डिज्नीच्या सिनेमामधली एखादी राजकन्या असावे असं मला वाटायला लागलं होतं.. जादू अजून काय वेगळी असते...
मला आमच्या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाची आठवण आली.. सदाशिवच्या गाण्याने काजवे येतात हा प्रसंग सुबोध जेव्हा आम्हाला समजावून सांगत होता, तेव्हा साधारण जे माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिलं होतं, किंवा तो प्रसंग चित्रित होत असताना तंत्रज्ञानाच्या मदतीनं आम्ही काजवे नंतर आणले होते; पण शूट करत असताना तो मला माझ्या आजूबाजूला ते आहेत अशा सूचना देत होता, ते मला आठवायला लागलं. त्या क्षणी माझ्या आजूबाजूला काजवे होते! खोटे नाही खरे होते!! ‘कट्यार’मधली ‘उमा’ मी पुन्हा जगत होते.. आणि आपसूकच आणि अर्थातच मी गायला लागले..
मन मंदिरा.. तेजाने ..उजळून घेई साधका..
संवेदना.. संवादे.. सहवेदना जपताना...
त्या रात्रीच्या अंधारामध्ये, त्या काजव्यांच्या प्रकाशामध्ये, माझे सूर.. शब्द.. अर्थ.. आठवणी.. सगळंच एकत्र मिसळून गेलं होतं.. मी गात होते.. वाऱ्याचा ठेका आणि रातकिड्यांचे सूर सोबतीला होते..
थोड्या वेळानं घरातून कार्बनच्या रडण्याचा आणि भुंकण्याचा आवाज यायला लागला, आणि नाईलाजानं उठून मी वर गेले. लाईट आले होते. मला दोन मिनिटं त्या गोष्टीचं वाईटच वाटलं! लाईट आले म्हणजेच वायफायसुद्धा परत सुरू झालं. म्हणजे बाहेरचं जग पुन्हा जवळ आलं. आत गेले तेव्हा फोन वाजतच होता. स्वप्नीलचा फोन आला होता. गणपतदादांनी बहुतेक त्याला सांगितलं असावं इकडे प्रचंड पाऊस पडतोय म्हणून. मी फोन उचलल्यावर तो एवढंच म्हणाला, ‘मी उद्या येतो आहे.’
...मी त्याला म्हणाले, ‘ये! मी, कार्बन, हनिवा आणि काजवे.. सगळे तुझी वाट बघत आहोत!’