ढिंग टांग : पूछना मना है..?
esakal May 22, 2025 11:45 AM

बेटा : (नेहमीप्रमाणे जोशात एण्ट्री घेत) ढॅण टढॅऽऽण…मम्मा, आयॅम बॅक!!

मम्मामॅडम : (नेहमीप्रमाणे पक्षकार्यात मग्न…) हंऽऽ..!

बेटा : (प्रश्नांची सरबत्ती करत) हे काय? मी एवढी भारी एण्ट्री घेतली, तुम्हाला आनंद नाही का झाला? आत्ताच मी पक्ष कार्यालयात जाऊन आलो, तिथंही हेच. सगळ्यांचे चेहरे असे दुर्मुखलेले का?

मम्मामॅडम : (कागदपत्रात डोकं घालून) हंऽऽ…चालायचंच! तुला भूक लागली असेल तर टेबलावर पास्ता ठेवलाय, तो खाऊन घे!

बेटा : (सात्त्विक संतापाने) आय डोण्ट वॉण्ट पास्ता, आणि फॉर दॅट मॅटर पिझ्झा!! पक्ष कार्यालयात गेलो तर लोक माझं तोंड चुकवत होते! खर्गेसाहेबही भेटले, पण म्हणाले, ‘अब्बी सवाल क्यूं खडा करनेका?’ मी म्हणालो की, ‘माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत! पक्षात, पक्षाबाहेर, विरोधी पक्षात कुणीही माझ्या प्रश्नांची उत्तरं का देत नाहीत?’

मम्मामॅडम : (कुजबुजत्या आवाजात) प्रश्न असेच विचारावेत की ज्याची उत्तरं देता येतील, बेटा!

बेटा : (खांदे उडवत) मग मी असं काय विचारलं की ज्याचं उत्तर देता येत नाही? आता एखाद्या घरासमोर गर्दी दिसली की आपण गंभीर चेहरा करुन विचारतोच ना- की बुवा कोण?

मम्मामॅडम : (दचकून) ओह गॉड!

बेटा : (वैचारिक मुद्रा करत) एक साधा प्रश्न होता माझा- पाकड्यांनी आपली किती विमानं पाडली! बस्स! नुसती बोटं दाखवली असती तरी माझं समाधान झालं असतं! दोन, तीन, पाच…जे काही असेल ते!! पण कुणी ऐकेल तर शपथ!! हॅ:!!

मम्मामॅडम : (ठामपणाने) आपला सैन्यावर विश्वास आहे की नाही?

बेटा : (अभिमानाने) अफकोर्स आहे! किंबहुना माझा तर आता फक्त सैन्यावरच विश्वास उरलाय! बाकी कुणावरही नाही!! पण ते कमळवाले उगाचच माझी बदनामी करतायत, म्हणे मला निशाने पाकिस्तान हा पुरस्कार मिळणार आहे!! नॉन्सेन्स!!

मम्मामॅडम : (हाताने झटकून लावत) जाऊ दे! ते कमळवाले किती नतद्रष्ट आहेत, हे बघितलंय ना आपण? त्यांच्या तोंडी न लागलेलं बरं! जिथे तिथे तुझी बदनामी चालवली आहे त्यांनी! कशाला आपण संधी द्यायची!!

बेटा : (आक्रमक पवित्र्यात) माझे फोटो वापरुन बदनामी करतात! करु देत! मी कुणाला घाबरत नाही! हो, मी विचारणार की आपली किती विमानं पाकड्यांनी पाडली! ते पाकडे म्हणतात, पाच-सात तर नक्कीच पाडली!

मम्मामॅडम : (समजुतीनं घेत) आपण त्यांची किती पडली, हे विचारावं!

बेटा : (तुच्छतेनं) छे, त्यांचे फक्त काही ड्रोन पडले म्हणे!

मम्मामॅडम : (उठून दारं खिडक्या लावून घेत) काहीही असलं तरी आपण असलं काहीतरी वेडंवाकडं विचारु नये, बेटा! आपलं सैन्य अतिशय ताकदवान आहे, आपण नेहमी शुभ बोलावं!!

बेटा : (आश्चर्यानं) सैन्याला आमचा पाठिंबा आहेच मुळी! पण पाठिंबा असणं वेगळं आणि प्रेमानं प्रश्न विचारणं वेगळं!! मुहब्बत में सवाल पूछे जाते है, मम्मा! उनके जबाब भी मुहब्बतसे दिये जाते है!!

मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) आता आपली शिष्टमंडळं परदेशात जाऊन सगळं सांगणार आहेत, त्यांच्याकडे सगळी माहिती आहे, त्यांनी विचारले का प्रश्न?

बेटा : (बेदरकारपणे) व्हॉटेव्हर…क्युरिआसिटी किल्स द कॅट…असं म्हणतातच!

मम्मामॅडम : (समाधानानं) शाब्बास! असा समजूतदारपणा हवा!

बेटा : (निर्धाराने) नोप! ही सरकारी शिष्टमंडळं जाऊन आल्यावर मी स्वत: परदेशात जाणार आणि सगळ्यांना खरी माहिती देणार आहे!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.