DC Owner Parth Jindal Demands Venue Change : आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यातून प्लेऑफमधील प्रवेश निश्चित होऊ शकतो. मात्र, या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदल यांनी सामना मुंबईऐवजी दुसऱ्या शहरात खेळवण्याची मागणी केली आहे.
पार्थ जिंदल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हा सामना दुसऱ्या शहरात खेळवणे योग्य ठरेल.”
पुढे बोलताना त्यांनी हैदराबाद-बेंगलोर सामन्याचा दाखला दिला. “यापूर्वी पावसामुळे हैदराबाद-बेंगलोर सामना लखनौमध्ये खेळवण्यात आला होता. त्याचप्रमाणे आजचा सामनाही दुसऱ्या शहरात हलवावा,” अशी मागणी त्यांनी केली. मात्र, आज रात्री 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असल्याने तो तातडीने दुसऱ्या शहरात हलवणे शक्य नाही.
कसे आहे समीकरण?सध्याच्या गुणतक्त्यानुसार, मुंबई इंडियन्सने 12 सामन्यांतून 14 गुण मिळवले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सने 12 सामन्यांतून 13 गुण कमावले आहेत. दोन्ही संघांचे प्रत्येकी दोन सामने शिल्लक असून, त्यापैकी एक सामना आज एकमेकांविरुद्ध आहे. जर मुंबईने आजचा सामना जिंकला, तर त्यांचे 16 गुण होतील आणि अखेरच्या साखळी सामन्याचा निकाल काहीही लागला, तरी त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित होईल. कारण दिल्लीने त्यांचा शेवटचा सामना जिंकला, तरी त्यांचे फक्त 15 गुण होतील.
जर मुंबईने आजचा सामना गमावला आणि दिल्लीचा विजय झाला, तर दिल्लीचे 15 गुण होतील, तर मुंबई 14 गुणांवरच राहील. अशा वेळी दोन्ही संघांचे अखेरचे साखळी सामने महत्त्वाचे ठरतील. मुंबई आणि दिल्ली यांचे अखेरचे साखळी सामने पंजाबविरुद्ध आहेत. अशा परिस्थितीत मुंबईने पंजाबला हरवणे आवश्यक असेल आणि त्याच वेळी पंजाबने दिल्लीला पराभूत करावे लागेल. त्या परिस्थितीत मुंबईचे 16 आणि दिल्लीचे 15 गुण असतील.
पावसाचे सावटआजचा सामना मुंबईत होणार असून, मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल आणि त्यांचे भवितव्य अखेरच्या साखळी सामन्यांवर अवलंबून राहील.