शिरोली पुलाची : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या (Pune-Bangalore National Highway) सहापदरीकरणाच्या कामादरम्यान ठेकेदार कंपनीने सांगली फाट्यावर ड्रेनेज लाईन बुजवली. परिणामी, पावसाचे पाणी सेवा मार्गावरच साचले असून संपूर्ण फाटा (Sangli Phata) जलमय झाला आहे. या पाण्यातून संथगतीने वाहतूक सुरू असून, वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहनचालक व नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
काल शिरोली परिसरात पावसाच्या सरी कोसळत होत्या. दुपारी तीनच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसानंतर सांगली फाटा उड्डाणपुलाखाली आणि पुण्याकडे जाणाऱ्या व कोल्हापूरकडे सेवा मार्गावर तलावासारखी स्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर तर दोन ते तीन फूट पाणी होते. या खोल पाण्यातून दुचाकी, रिक्षा, कार, ट्रक यांना जास्तीचा वेळ आणि सावधगिरीने मार्ग काढावा लागत आहे. काही ठिकाणी पाण्यातून गाडी ढकलत नेतानाचे दृश्यही पाहायला मिळाले.
वाहतुकीचा वेग अत्यंत मंदावल्यामुळे महामार्गावर आणि कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावर दोन्ही बाजूंनी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या. सांगली फाटा ते पंचगंगा पूल, तावडे हॉटेल, तसेच सांगली फाट्याच्या पुढे कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी ठेकेदार कंपनीच्या ढिसाळ नियोजनावर संताप व्यक्त केला. तत्काळ ड्रेनेज व्यवस्थित करण्याची मागणी होत आहे.
महामार्ग सहापदरीकरणाच्या कामामध्ये नियोजनाचा अभाव आहे. स्थानिक वाहतूक आणि नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच वाहनधारकांची मोठी अडचण होत आहे.
- अंजुम देसाई, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र, दलित महासंघ
महामार्ग प्राधिकरणाने सांगली फाटा येथील ड्रेनेज लाईन तत्काळ खुली करावी आणि पावसाचा स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- विजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य