नाशिक- दहावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण/आर्किटेक्चर या शाखेतील पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमास प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया मंगळवार (ता. २०)पासून सुरू झाली असून, १६ जूनपर्यंत मुदत दिली. प्रत्यक्ष प्रवेश फेरी (कॅप राउंड)ची प्रक्रिया सुरू होऊन प्रवेश निश्चितीसाठी जुलै उजाडणार आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाचे वेध लागले होते. अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असताना, पदविका स्तरावरील प्रवेशप्रक्रियेची प्रतीक्षा कायम होती. अखेर तंत्रशिक्षण संचालनालयाने सोमवारी (ता. १९) रात्री उशिरा पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असेल. प्राथमिक नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी विद्यार्थ्यांना करून घ्यावी लागणार आहे. त्या आधारे गुणवत्ता यादी तयार होऊन पात्रताधारक विद्यार्थ्यांना प्रवेशफेऱ्यांमध्ये सहभागी होऊन प्रवेश निश्चितीची संधी उपलब्ध होऊ शकेल.
असे आहे प्रवेश वेळापत्रक
ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रे अपलोड करणे- २० मे ते १६ जून
कागदपत्रे पडताळणी (ई-स्क्रुटीनी/प्रत्यक्ष स्क्रुटीनी)- २० मे ते १६ जून
प्रारूप गुणवत्ता यादीची प्रसिद्धी- १८ जून
हरकती नोंदविण्याची मुदत- १९ ते २१ जून
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी- २३ जून