Cyber Security : ऑनलाइन फसवणुकीची भीती आहे? सरकारने सुरू केली "स्कॅम-प्रूफ" वेबसाईट, तुमचे सर्व अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर
esakal May 21, 2025 05:45 PM

आजच्या डिजिटल युगात व्यवहार सुलभ झाले असले, तरी त्यासोबत सायबर फसवणूकही तितकीच वेगाने वाढत आहे. UPI, ऑनलाइन बँकिंग, पेमेंट अॅप्सचा वापर वाढल्यामुळे आर्थिक व्यवहार झपाट्याने होत आहेत, पण याचं संधीचं सोने सायबर गुन्हेगार करत आहेत. दररोज कोट्यवधी रुपयांची फसवणूक होतेय आणि सामान्य नागरिक याचे बळी ठरत आहेत.

अनेकदा फसवणूक केवळ एका चुकीच्या क्लिकमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे होते. पण आता सरकारने एक विशेष वेबसाइट सुरू केली आहे, जी नागरिकांना ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी मदत करते, आणि तुम्हाला "स्कॅम प्रूफ" बनवू शकते.

National Cyber Crime Reporting Portal (NCCRP) ही सरकारची अधिकृत वेबसाईट आहे, जिथे तुम्ही केवळ तक्रार नोंदवू शकत नाही, तर फसवणूक होण्याआधीच ती ओळखू शकता

या पोर्टलवर काय करता येते?

1. संशयास्पद कॉल, मेसेज, UPI ID किंवा बँक डिटेल्स मिळाल्यास, त्या व्यक्तीविरोधात आधीच तक्रार नोंदवलेली आहे का, हे तपासता येते.

2. फसवणूक झाल्यास त्वरित ऑनलाइन तक्रार नोंदवता येते.

3. स्कॅमरबद्दलची माहिती मिळाल्यास, ती इतरांनाही उपयोगी पडते.

फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

1. सर्वप्रथम https://cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2. उजव्या कोपऱ्यातील तीन पट्ट्या (Hamburger Menu) वर क्लिक करा.

3. त्यामधील “Report & Check Suspects” हा पर्याय निवडा.

4. पुढे “Suspect Repository” > “Check Suspect” वर क्लिक करा.

5. आता तुम्ही संबंधित व्यक्तीबद्दलची माहिती भरा जसं की मोबाइल नंबर, बँक अकाउंट नंबर, UPI आयडी किंवा ईमेल.

6. माहिती सबमिट करताच, त्या व्यक्तीविरुद्ध आधी तक्रार आहे का, हे तपशीलांसह समोर येईल.

या सुविधेचे फायदे
  • कोणताही व्यवहार करण्याआधी फसवणूक होण्याचा धोका तपासता येतो.

  • संशयास्पद कॉल्स किंवा मेसेज मिळाल्यास लगेच कारवाई करता येते.

  • तुमच्या मित्र-परिवारालाही सुरक्षित ठेवता येतं.

सायबर गुन्हेगारांची शक्कल जितकी चतुर, तितकीच आपली सावधगिरीही महत्त्वाची! सरकारने उपलब्ध करून दिलेल्या NCCRP पोर्टलचा योग्य वापर करा आणि फसवणुकीपासून स्वतःचं आणि आपल्या परिवाराचं संरक्षण करा. काही सेकंदात स्कॅमर ओळखा आणि व्हा डिजिटल दुनियेत “स्कॅम-प्रूफ”!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.