शिखर धवनने प्रेयसीसाठी खरेदी केला एक आलिशान फ्लॅट; किंमत वाचाल तर आवाक् व्हाल
GH News May 22, 2025 01:03 AM

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही चर्चेत आहे. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर शिखर धवन आयुष्याची दुसरी इनिंग सुरु केली आहे. शिखर धवनने इंस्टाग्रामवर नव्या नात्याचा खुलासा केला होता. आयर्लंडमध्ये जन्मलेल्या सोफी शाइनच्या प्रेमात पडल्याचं त्याने सांगितलं होतं. सोफीनेही धवनसोबतचा फोटो शेअर करून प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे या दोघांबाबत सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकतील असं सांगण्यात येत आहे. असं असताना धवनने त्याच्या प्रेयसीसाठी कोट्यवधि रुपयांचं अलिशान घर खरेदी केलं आहे. मिडिया रिपोर्टनुसार, धवनने गुरुग्राममधील गोल्फ कोर्स रोडवरील डीएलएफच्या सुपर-लक्झरी निवासी प्रकल्प ‘द डहलियास’ मध्ये एक फ्लॅट खरेदी केला आहे. रिअल इस्टेट डेटा एनालिटिक्स फर्म सीआरई मॅट्रिक्सनुसार, शिखर धवनने 4 फेब्रुवारी 2025 रोजी हा करार केला आहे.

मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये डीएलएफने हरियाणातील गुरुग्राम येथील डीएलएफ फेज 5 मध्ये 17 एकरांवर पसरलेला ‘द डहलियास’ हा एक सुपर लक्झरी निवासी प्रकल्प सुरू केला होता. यामध्ये 420 अपार्टमेंट आणि पेंटहाऊसचा समावेश आहे.फर्मच्या अहवालानुसार, घर 6040 चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे आणि त्याची किंमत सुमारे 65.61 कोटी रुपये आहे. तसेच त्याला यासाठी 3.28 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावी लागली. त्यामुळे धवनला या घरासाठी जवळपास 69 कोटी रुपये मोजावे लागले आहेत.

सोफी शाइन आणि शिखर धवन पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेदरम्यान दिसले होते. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. सोफी शाइन अबू धाबी येथील नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशनमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम पाहते. तर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून इतर लीग स्पर्धांमध्ये खेळत आहे. दरम्यान, धवनचं पहिलं लग्न आयेशा मुखर्जीसोबत झालं होतं. 11 वर्षे एकत्र संसार केल्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये दोघेही वेगळे झाले. धवनला पत्नीपासून मानसिक त्रास होत असल्याचा युक्तीवाद वकीलांनी केला होता. दरम्यान, धवनने आपला मुलगा जोरावरला आपल्यापासून दूर केलं जात असल्याचं दुखही व्यक्त केलं होतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.