आयपीएलनंतर रोहित शर्मावर शस्त्रक्रिया होणार, पाच वर्षांपासून त्रास होता; पण…
GH News May 22, 2025 01:03 AM

रोहित शर्मा आता आंतरराष्ट्रीय टी20 आणि कसोटी खेळताना दिसणार नाही. कारण त्याने या दोन्ही फॉरमेटमधून निवृत्ती घेतली आहे. वनडे क्रिकेटमध्ये अजूनही संघाचं नेतृत्व करणार आहे. 2023 या वर्षी वनडे वर्ल्डकप विजयाचं स्वप्न भंगलं होतं. त्यामुळे 2027 या वर्षी ते पूर्ण करण्याचा मानस आहे. त्यामुळे आयपीएल 2025 स्पर्धा संपल्यानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा तयारीला लागणार आहे. यासाठी त्याने सर्वात आधी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, मागच्या पाच वर्षात रोहित शर्माला हा त्रास जाणवत आहे. त्यामुळे फलंदाजीत त्याचं खूप नुकसान झालं आहे. रोहित शर्माला हॅमस्ट्रिंग इंजरी असून त्याचा त्रास सहन करत आहे. या दुखापतीवर एकमेव उपचार म्हणजे शस्त्रक्रिया. त्यामुळे आयपीएल संपल्यानंतर शस्त्रक्रिया करेल असं सांगण्यात येत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, रोहित शर्मा 2027 वनडे वर्ल्ड कप खेळू इच्छित आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याची ही योग्य वेळ आहे.

रोहित शर्मा गेल्या काही वर्षापासून शस्त्रक्रिया करणं टाळत होता. कारण त्याच्या खांद्यावर संघाची जबाबदारी होती. त्यामुळे मोठ्या स्पर्धांसाठी सर्जरी करत नव्हता. पण आता टी20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी संघातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यातून रिकव्हर करण्यास बऱ्यापैकी वेळ मिळणार आहे. भारतीय संघ पुढच्या महिन्यात कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तसेच पुढचे तीन महिने एकही वनडे मालिका नाही. त्यामुळे रोहित शर्मा शस्त्रक्रिया करू शकतो. तसेच त्याला रिकव्हर होण्यास बऱ्यापैकी वेळ मिळेल.

रोहित शर्माने 2016 मध्ये क्वाड्स टेंडन सर्जरी केली होती. यातून रिकव्हर होण्यास त्याला तीन महिन्यांचा कालावधी लागला होा. हॅमस्ट्रिंग शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यातून बरं होण्यास तीन चार महिन्यांचा कालावधी लागतो. या शस्त्रक्रियेनंतर रोहित शर्माला फलंदाजी करण्यात येणारी अडचण दूर होणार आहे. रोहित शर्मा दीड वर्षांनी म्हणजेच 2027 वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी फीट राहील. त्यामुळे त्याला ही सर्जरी अत्यावश्यक आहे. दरम्यान, भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. मात्र हा दौरा अजूनही निश्चित नाही. दोन्ही देशातील संबंध पाहता दौऱा होणं कठीण दिसत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.