जाधववाडी, ता.२१ ः गेल्या अनेक दिवसांपासून वडाचा मळा ते आहेरवाडी चौकापर्यंत असलेले पथदिवे बंद असल्याने रस्त्यावर अंधार असतो. महापालिका हे दिवे कधी सुरू करणार ? असा प्रश्न नागरिक करत आहेत.
अनेक दिवसांपासून पथदिवे बंद असूनही महापालिकेच्या लक्षात कसे आले नाही ? असा सवाल नागरिक करत आहेत.
वडाचा मळा ते आहेरवाडी चौक हा रात्री येणाऱ्या जाणाऱ्या नोकरदारांसाठी मुख्य रस्ता आहे. मात्र तेथील पथदिवे बंद असल्याने रस्त्यावरून चालताना भीती वाटत असल्याची माहिती महिलांनी दिली. रात्री रस्त्यावर भटके श्वान फिरत असतात. ते अंधारात बसलेले असतात पथदिवे बंद असल्याने त्यांचा मागमूस लागत नाही. त्यामुळे अचानक त्यांचा झुंड अंगावर धावून येण्याचे प्रकार घडले आहेत. रस्त्यावर खड्डे असल्याने अंधारात ते न दिसल्याने खड्ड्यांत पाय जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच पावसाच्या पाण्याने हे खड्डे भरल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहन अचानक खड्ड्यांत आदळते. खड्ड्यांतील पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडाल्याने अनेकदा वाहन चालक आणि पादचारी यांच्यात भांडणे होतात.
महिला कामगार सोनल मिश्रा म्हणाल्या,‘‘या रस्त्यावर रात्री अंधार असल्याने कामावरून येणाऱ्या महिलांना भीती वाटते. त्यामुळे महापालिकेने त्वरित पथदिवे पूर्ववत सुरू करावेत.’’
कामगार संतोष लोहार म्हणाले,‘‘रात्री कामावर जाताना पथदिवे बंद असल्याने खूप अंधार असतो. त्यामुळे पथदिवे त्वरित चालू करावेत.’’