मुंबई : ‘‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेमधील युती ही प्रस्तावाच्या चक्रात अडकणार नाही. हा प्रस्तावाचा खेळ नाही. राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हे दोन्ही नेतेच थेट चर्चा करतील,’’ अशी भूमिका शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केली.
ठाकरे यांची शिवसेना व मनसेच्या युतीची चर्चा दोन्ही नेते परदेशात असल्याने थांबली होती. हे दोन्ही नेते मुंबईत परतल्यानंतर पुन्हा या चर्चांना सुरुवात झाली आहे. यावर भूमिका मांडताना राऊत म्हणाले, की प्रस्तावाच्या खेळात ठाकरे यांची शिवसेना व मनसे यांची युती होऊ देणार नाही, असे कोणाला वाटत असेल तर तसे होणार नाही. मनसेने याआधी ज्या पक्षांबरोबर युती केली होती त्यावेळी त्यांनी असे प्रस्ताव दिल्याचे आमच्या नजरेत आलेले नाही. राज ठाकरे यांनी जी युतीची भूमिका मांडली त्याला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता हे प्रस्ताव वगैरे विषय चर्चेत येत नाहीत. सध्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा व्हायला पाहिजे.
ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत, की युतीबाबत समोरून भावना व्यक्त केली आहे. या भावनेचा आपण आदर केला पाहिजे. महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या, मुंबईच्या हितासाठी उचलेले पाऊल म्हणून पाहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणारयुती संदर्भातील चर्चा प्रत्यक्षात लवकरच सुरू होतील. दोघेही भाऊ मोठे राजकीय नेते आहेत. ते दोघे थेट चर्चा करतील. त्याबद्दल आम्ही योग्य वेळी कल्पना देऊ, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.