Vaishnavi Hagawane Case : मी लग्न करून...; वैष्णवी हगवणेची ऑडिओ क्लिप, सासरच्यांकडून होणारा छळ मैत्रिणीला सांगितला
Saam TV May 22, 2025 03:45 AM

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. वैष्णवीची आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. या प्रकरणाचा बावधन पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता वैष्णवीच्या कथित ऑडिओ क्लिप समोर आल्या असून त्या व्हायरल होत आहे. वैष्णवी आपल्या मैत्रिणीला फोनवरून तिचे कुटुंबीय तिला कसा त्रास देतात हे सांगताना त्यामध्ये ऐकू येत आहे.

व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवी सांगते की, 'मी करून चूक केली. मला ताई (नणंद) म्हणाली की मी तुझी सगळीकडे बदनामी करते. जे केलंय ते सगळं सांगते. तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते. शशांकसोबतही तू कधी लॉयल नव्हती असं मला ताई म्हणाली. तू फालतू आहेस तू घाणेरडी आहे असं ती मला म्हणाली. पप्पा आणि मम्मींना ती काही काही म्हणत होती.'

या ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवी असे देखील म्हणते की 'मला मारताना दाजी बघत होते. त्यानंतर त्यांनीपण माझ्यावर हात उचलला. दाजींनाही ते खरं वाटलं आहे. त्यामुळे मी त्या माणसाला घटस्फोट देणार आहे. मी पप्पांना हे सगळं सांगितलं. आपण त्यावर विचार करू असं मला ते म्हणाले. मला आश्चर्य वाटत आहे की माझा नवराच माझा कधी झाला नाही. सासू सासरे याचं तसंच वागणं असतं.'

तसंच, 'मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं इथंच माझी चूक झाली. मी त्या घरात जाऊन चूक केली. सगळं बोलण्याच्या, समजण्याच्या पलीकडे गेलंय. ही छोटी गोष्ट आहे.', असं देखील ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवी बोलताना ऐकू येत आहे. वैष्णवी प्रकरणात तिचा पती, सासू आणि नणंदेला अटक केली आहे. तर तिचा सासरा आणि दीर फरार आहे.

दरम्यान, वैष्णवी हगवणेने १६ मे रोजी आत्महत्या केली होती. पण तिने आत्महत्या केली नसून तिची सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तिचा पती, सासू-सासरे, दीर आणि नणंद छळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महत्वाचे म्हणजे वैष्णवीने शंशांकसोबत लव्ह मॅरेज केले होते. त्यांचे २०२३ मध्ये त्यांनी थाटामाटात लग्न केले होते. पण लग्नाच्या सहा महिन्यातच सासरच्या मंडळींनी तिचा छळ करण्यास सुरूवात केली होती. हुंड्यासाठी तिला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.