Solapur News : सोलापूर बसस्थानकावर चोरट्यांकडून 'लाडक्या बहिणी' टार्गेट ; दोन महिन्यांत ३२ महिलांचे दागिने लंपास
esakal May 22, 2025 06:45 PM

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये लाडक्या बहिणींसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे एसटीतून दररोज प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या लाखोंच्या घरात आहे. स्थानकावर बस आल्यानंतर गाडीत चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांच्या गळ्यातील, पर्समधील दागिने चोरत आहेत. दोन महिन्यांत सोलापूर शहर-जिल्ह्यात ३२ महिलांचे दागिने व अन्य ऐवज चोरीला गेला आहे.

महिलांना एसटी प्रवासात सवलत असल्याने सोलापूरसह ग्रामीणमधील विशेषत: बार्शी, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, अक्कलकोट येथील स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळते. बसगाड्यांची वाट पहात थांबलेले प्रवासी बस आल्यानंतर बसायला जागा मिळावी म्हणून गडबडीने आत जाण्याचा प्रयत्न करतात. एकच दरवाजा असल्याने त्यावेळी बसच्या दरवाजाजवळ खूपच गर्दी होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण किंवा पर्समधील दागिने, रोकड लंपास करतात. पोलिसांना तपासात अनेकदा त्या चोर महिलाच असल्याचे आढळून आले असून तिकीट दरात ५० टक्के सवलत असल्याने त्यांच्याकडून असे प्रकार होतात, असे पोलिस सांगतात.

सोलापूरच्या मुख्य बस स्थानकावर वारंवार महिलांचे दागिने, साहित्य चोरीला जाण्याचे प्रकार घडतात. त्याठिकाणी दोन शिफ्टमध्ये आमचे अंमलदार नेमले आहेत. पण, बसमध्ये चढताना गर्दीत असे प्रकार होतात. तपास करताना सीसीटीव्हीचा अभाव असल्याचे दिसते. त्याअनुषंगाने विभाग नियंत्रकांना वर्षभरात तीनवेळा पत्रव्यवहार केला, पण काहीच कार्यवाही झालेली नाही.

- अरविंद माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, फौजदार चावडी पोलिस ठाणे

अहवाल पाठवूनही स्थानकांवर सीसीटीव्ही अपुरेच

स्वारगेट येथील बस स्थानकावर प्रवासी तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर परिवहन मंत्र्यांनी राज्यातील सर्व बस स्थानकांवर सीसीटीव्ही बसविणे, महिला सुरक्षारक्षक नेमणे, पुरेशा प्रमाणात पोलिस नेमणे, अशा उपाययोजना करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार त्यांनी प्रत्येक विभागांकडून अहवाल देखील मागविले, पण त्या अहवलावर कार्यवाही झालेली नाही. सोलापूरचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी म्हणाले, ‘प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दुप्पट सीसीटीव्ही बसविणे, सुरक्षारक्षक नेमण्यासंदर्भातील अहवाल पाठविला असून त्यावर पुढील महिन्यात निर्णय अपेक्षित आहे’.

प्रवास अर्ध्यातून सोडून महिला पोलिस ठाण्यात

बस स्थानकांवरील अस्ताव्यस्तपणे थांबलेल्या गाड्या, गाड्यांची गर्दी आणि सीसीटीव्हीची अपुरी संख्या, यामुळे ती चोरी नेमकी केली कोणी, याचा शोध घ्यायला पोलिसांना अडचणी येतात. त्यामुळे अनेक गुन्ह्यांचा तपास दोन-चार महिन्यानंतरही लागलेला नाही, अशीही उदाहरणे आहेत. अनेक महिलांना चोरी झाल्यानंतर पुढचा प्रवास थांबवून पोलिसांत जावे लागत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.