विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं, महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात सत्तेत आलं. मात्र त्यावेळी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती. मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी देखील बोलून दाखवली होती. मात्र त्यानंतर अखेर भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं आहे. भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
मला काल मीडियाने विचारले, तुम्ही म्हणाले होते, ‘जहा नही चैना वहा नही रेहेना’ मग मी म्हणालो ‘देर आये दुरुस्त आये’ काही लोक थोड्या वेळ या घरात तर थोड्या वेळ त्या घरात असतात, अशा लोकांना हे दु:ख कळणार नाही. मागच्या मंगळवारी आमची बैठक झाली आणि तेव्हाच ठरलं होतं की शपथ घ्यायची आहे, पण मी कोणालाच नाही सांगितलं, असा गौप्यस्फोट यावेळी भुजबळ यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यावेळीच सांगितलं होतं की दुरुस्त करायला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रयत्न केले. माझ्या पेक्षा जास्त आनंद तुम्हा सगळ्यांना झाला, हा साप शिडीचा खेळ आहे. थोडं वर गेलं की खाली देखील येतं. चालूच असतं, त्याला कोण काय करणार. कधीकधी अशा गोष्टी पण घडतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसतो.
पुढच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत, आम्ही जेलमध्ये अडकलो होतो तेव्हा देखील आत बसून आपले लोक सभापती केले. तुम्ही जर अजितदादांच्या जास्त जागा निवडणून दिल्या तर फयदा आहे. आता सगळ्यांना बरोबर घेऊन निवडणूक लढायची आहे. अजितदादांनी सुद्धा सांगितलं आम्ही सगळ्यांना घेऊन पुढे जाणार, सगळ्यांना सोबत घेऊन महानगर पालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची आहे. निवडणुकीत सगळ्यांना संधी द्यावी लागेल, पडला तरी चालेल पण तो घटक आपला आहे. सगळ्यांसाठी प्रयत्न करायचे तुम्ही सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत लोकांमध्ये राहायला हवं, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.