नांदगाव- येथून जवळच सहा किलोमीटर अंतरावर नाग्यासाक्या धरणाजवळील पांझण नदीवर पुलाचे कठडे तोडून आयशर ट्रक खोल नदीपात्रात जाऊन कोसळला. अपघातग्रस्त आयशर ट्रकमध्ये स्फोटके असूनही सुदैवाने भीषण अनर्थ टाळला.
नांदगावहून मालेगावकडे जिलेटीन घेऊन जाणारा आयशर ट्रक ( एमएच २०जी सी १८०६) नाग्या साक्या धरणाजवळील पांझण नदीवरील अरुंद पुलावरून जात असताना एका अन्य वाहनाने हुलकावणी दिल्याने ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून हा ट्रक थेट नदीपात्रातील खडका वर जाऊन आदळला.
मात्र आयशर नदीत कोसळण्याच्या आवाजाने भाऊसाहेब सोनवणे व अन्य आजूबाजूला राहणारे रहिवाशी धावून आले व जखमी चालकाला बाहेर काढले. आजच्या या घटनेमुळे तीन वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताची आठवण जागी झाली. तेव्हा या पुलाला कठडे नसल्यामुळे झालेल्या अपघातात मालेगाव येथील मारुती ईको वाहन मध्यरात्री थेट नदीत कोसळून दोन वर्षाच्या लहान मुलासह अन्य दोघे जागेवरच ठार झाले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावर कठडे बसविले होते.
नांदगाव मालेगाव या राज्य मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ कायम असते त्यात हा मार्ग अलीकडेच हायब्रीड अँन्युईटी मधून तयार करण्यात आला असल्याने वाहनांना कमी वेळात नांदगाव मालेगावला पोहचता येत असते रस्ता झाला मोठा पूल ठरला छोटा अशी अवस्था असलेला पूल अगोदरच अरुंद त्याला संलग्न रस्ता मात्र मोठा असे स्वरूप आलेल्या या पुलाची उंची पाच मीटर असून त्यात एकूण बारा गाळे असून पुलाची लांबी ८४ मीटर एवढी ''आहे.
हा पूल वाढत्या अपघातामुळे ब्लॅकस्पॉट ठरला असून पुलाकडून येताना व जातानाही मोठा सरळ उताराचा रस्ता असल्याने ऐनवेळी वेगातील वाहने पुलाजवळ येताच नियंत्रण गमावून बसत असतात. त्यामुळे या पुलाच्या सुरक्षितेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कायम स्वरूपी उपाययोजना कराव्यात. अशी मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.