swt223.jpg
65568
कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना काका कुडाळकर. बाजूला नितीन वाळके, सुनील भोगटे, चंद्रकांत कुंभार, नंदन वेंगुर्लेकर आदी.
सिंधुदुर्गात लवकरच
''ओबीसी'' मेळावा
काका कुडाळकर ः मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २२ ः ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल त्यांचे ओबीसी व आरक्षित महासंघ सिंधुदुर्गतर्फे पत्रकार परिषदेत अभिनंदन करण्यात आले. लवकरच त्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाचा भव्य मेळावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत ओबीसी व आरक्षित महासंघ राज्य समन्वयक काका कुडाळकर, जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी सांगितले.
येथील एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत सुनील भोगटे, चंदकांत कुंभार, नंदन वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. श्री. कुडाळकर म्हणाले, "पहिल्या फळीतले नेते असलेल्या छगन भुजबळ यांना पहिल्यावेळी मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळणे यामागे मोठे आरक्षण विरोधी षड्यंत्र होते. त्याचा प्रत्यय बुधवारी (ता. २१) मनोज जरांगे यांनी भुजबळांच्या शपथविधीवर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर पुन्हा एकदा आला. पहिल्या दिवसापासून ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कसल्याही प्रकारचा विरोध नाही, हे विधान स्पष्ट असताना सुद्धा अनावश्यकरित्या जरांगे ओबीसी समाजाच्या राखीव जागांमधूनच आपल्याला आरक्षण पाहिजे, असा अट्टहास धरत होते. त्या अट्टहासाला कालच्या शपथविधीने स्पष्ट उत्तर दिले आहे. ओबीसीच्या आवाजाला पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसींचे हित राखण्यासाठी आणि भविष्यात विविध योजना राबविण्याचे काम मंत्रिमंडळात भुजबळ यांच्या माध्यमातून होणार आहे."
नितीन वाळके म्हणाले, "महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे. ओबीसींचा हा लढा पुढे नेण्यासाठी ही निवड उपयोगी ठरेल. जातनिहाय जनगणनेची मागणी पहिल्यापासूनच होती. ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेल्या जातनिहाय जनगणनेत ओबीसी हे ७७ ते ७८ टक्क्यांपर्यंत आहेत, हे स्पष्ट झाले होते. केंद्राच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आजही भारतामध्ये मनुस्मृती कार्यरत आहे का, काय शंका येते. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचा सुपुत्र सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पहिल्यांदा अधिकृतरित्या विराजमान झाल्यानंतर त्यांच्या भेटीवेळी एकही वरिष्ठ अधिकारी त्यांच्या स्वागताला उपस्थित नव्हता, येथपर्यंत ही पाळेमुळे गेलेली आहेत. कदाचित त्याच्यावरचा उतारा म्हणून भुजबळ यांना मंत्रिपद दिले असावे."