कोंढवा - कोंढव्यात हनीट्रॅपचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पती-पत्नीने खंडणी उकळण्यासाठी घरी बोलावून डांबून ठेवलेल्या व्यक्तीची कोंढवा पोलीसांच्या सतर्कतेमुळे सुटका झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कोंढव्यातील व्यावसायिक प्रविण लोणकर (वय ३९) यांना त्यांची बालपणीची मैत्रिण सोनल ऊर्फ सोनी कापरे हिने गुरुवारी (ता. २२) सायंकाळी तिच्या घरी चहा पिण्याच्या बहाण्याने व्हिडिओ कॉल करुन घरी बोलावून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून जखमी केले व तिचा पती अतुल रायकर व त्याच्या साथीदारांनी मारहाण करत फ्लॅटमध्ये हात पाय बांधून डांबून ठेवले.
त्यांच्याकडून एटीएम कार्ड व मोबाईल काढून घेत पैसे व घरातील दागिने न दिल्यास मारहाण करण्याची धमकी दिली. तसेच, त्यांच्या मोबाईलवरुन पत्नीला मेसेज करुन 'घरातील दागिने व पैसे काढून ठेव मी एकाला घरी पाठवत आहे, असे मेसेज पाठवले.
हे मेसेज पाहिल्यानंतर प्रविण यांच्या पत्नी पोलिस ठाण्यात आल्या. त्यांनी संपूर्ण हकीकत सांगितल्यानतंर प्रकरणाचे गांभिर्य ओळखून रात्रगस्त अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव यांनी तपास सुरु केला. मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावरुन आरोपीच्या घराचा पत्ता शोधत प्रविण लोणकर यांची सुटका केली.
त्यानंतर प्रविण यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा करणाऱ्या आणि व्हिडिओ कॉल करत हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोनल ऊर्फ सोनी कापरे हिच्यासह अतुल दिनकर रायकर, रॉबीन ऊर्फ रवी मंडल, सुरेश ऊर्फ कुरेश यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. आरोपीची न्यायालयाकडून पोलीस कस्टडी घेण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक रविंद्र गावडे करत आहेत.
प्रतिक्रिया
हा एकप्रकारे हनीट्रॅपचाच प्रकार होता. कारण, आरोपीने फिर्यादीला व्हिडिओ कॉल केले होते. आरोपीचा हेतू हा पूर्णपणे फिर्यादीला या प्रकारात अडकवून खंडणी घेण्याचा होता. त्यानुसार आम्ही गुन्हा नोंद केला आहे.-सुकेशनी जाधव, सहायक पोलिस निरिक्षक, कोंढवा पोलिस ठाणे.