पुणे : पुणे महापालिकेला मिळणारे उत्पन्न, ठेकेदाराकडून मिळालेली अनामत रक्कम, बँक गॅरंटी यासह अन्य कारणाने महापालिकेच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा झाली आहे. त्यापैकी ७०० कोटी रुपयांची रक्कम मुदत ठेव ठेवण्यास स्थायी समितीने घेतला आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यात एकूण १७०० रुपयाची रक्कम महापालिकेत एफडी केली आहे.
महापालिकेकडून अंदाजपत्रकात दरवर्षीच्या जमा-खर्चाचे नियोजन केले जाते. त्यात काही निधी शिल्लक राहिलाच तर ही रक्कम राष्ट्रीयकृत बॅंकामध्ये गुंतविण्यात येतो. गेल्यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असल्याने जवळपास सात ते आठ महिने आचारसंहितेत गेले. त्यामुळे रक्कम खर्ची न पडल्याने मोठ्या रकमेची बचत झाली. त्यामुळे जानेवारी महिन्यात प्रशासनाने सुमारे ५०० कोटी बॅंकामध्ये गुंतविले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात ५०० कोटीची एफडी केली होती. आता आणखी ७०० कोटी रुपयांची एफडी केली आहे.
गल्लीबोळातील छोटी कामे करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे नागरिकांनी कामे सांगितल्यानंतर निधी नसल्याचे उत्तर अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे. असे असताना महापालिकेकडील हा निधी कामांसाठी उपलब्ध होत नाही. शहरातील विकास कामे पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारास त्यांची बॅंक गॅरंटी, अनामत रक्कम परत करावी लागते. त्यामुळे ही रक्कम खर्ची पाडता येत नाही. त्यामुळे अशा खर्ची न पाडल्या जाणाऱ्या रक्कमा बँकेत एफडी ठेवल्या जातात.