पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने आत्महत्या केली. वैष्णवीच्या आत्महत्येपासून हगवणे कुटुंबीय चर्चेत आले. सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी होणारा छळ, मानसिक आणि शारीरिक त्रास याला वैतागून वैष्णवीने १६ मे रोजी गळफास लावून आत्महत्या केली. पण वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. वैष्णवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून देखील धक्कादायक माहिती समोर आली. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीचे अनेक व्रण दिसून आले आणि त्याचे फोटो देखील समोर आले आहेत.
वैष्णवीला हालहाल करून मारणाऱ्या हगवणे कुटुंबीयांबाबत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. स्वत:ला श्रीमंत म्हणणाऱ्या हगवणे कुटुंबीयांना फक्त हुंड्यासाठी आपल्या दोन्ही सूनाचा छळ केला. या छळातून वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. पण श्रीमंतीचा आव आणणाऱ्या या हगवणे कुटुंबातील सदस्य नेमकं काय करतात? त्यांचा व्यवसाय काय आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. त्यांना शशांक आणि सुशिल ही दोन जुळी मुलं आणि करिश्मा ही मुलगी आहे. राजेंद्र जमिनीचे व्यवहार करण्यासाठी एजन्सी चालवतात. प्लॉटिंग करून विकणे हा त्यांचा व्यवसाय आहे. तसेच मुळशीच्या राजकारणात ते सक्रिय आहेत. तर राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते. मुळशी मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक ही यापूर्वी लढवलेली होती.
राजेंद्र यांचा मोठा मुलगा सुशिल हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे. त्याने भुकूम येथे पक्षाचे कार्यालय सुरू केले होते. वैष्णवीचा नवरा शशांक हा जेसीबी मशिन भाड्याने देण्याचा व्यवसाय करत होता. त्यासाठी त्याने मशिनरी विकत घेतली होती. तसेच तिघे जण वर्षातून एकदा भुकूम येथे भव्य बैलगाडा शर्यत भरवत होते. शशांक च्या लग्नामध्ये हगवणे कुटुंबियांनी गौतमी पाटीलला बोलवलं होतं.
नाचत असलेल्या स्टेजसमोर त्यांनी खरी बैलजोडी उभी केली होती. याची सर्वत्र चर्चा देखील झाली होती. करिष्मा हगवणे ही राष्ट्रवादीची महिला पदाधिकारी होती. त्याचबरोबर तिने पुणे शहरात ब्युटीक म्हणजे कपड्याचे दुकान सुरू केलं होतं. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल आहेत. त्याचबरोबर ती अनेक मोठमोठ्या हॉटेलमध्ये पार्टी करत होती याचे देखील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर आहेत. वैष्णवीच्या छळाला तिची नणंदच सर्वात जास्त कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.