आयपीएलच्या 18 व्या मोसामातील 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. आरसीबीने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. मात्र आरसीबीसाठी हैदराबाद विरुद्धचा सामना हा टॉप 2 च्या हिशोबाने फार महत्त्वाचा आहे. या सामन्याचं आयोजन हे लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मात्र या निर्णायक सामन्याआधी आरसीबीला मोठा झटका लागला आहे. आरसीबीचा नियमित कर्णधार बदलण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील खेळाडूला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. रजत पाटीदार दुखापतीमुळे या सामन्यात इमपॅक्ट प्लेअर म्हणून खेळतोय. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भासाठी खेळणारा विकेटकीपर बॅट्समन जितेश शर्मा याला आरसीबीच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. जितेशने टॉस जिंकून हैदराबाद विरुद्ध बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
आरसीबीने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन एकमेव बदल केला आहे. युवा फलंदाज देवदत्त पडीक्कल याच्या जागी मयंक अग्रवाल याला संधी देण्यात आली आहे. तर नियमित कर्णधार रजतपाटीदार इमपॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार असल्याचं जितेशने टॉस दरम्यान सांगितलं. तसेच सनरायजर्स हैदराबादने तब्बल 3 बदल केले आहेत. स्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड याचं कमबॅक झालं आहे. हेडला कोरोनामुळे दुसऱ्या टप्प्यातील सामन्याला मुकावं लागलं होतं त्यानंतर आता हेड परतलाय. तसेच हेड व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि अभिनव मनोहर यांचंही पुनरागमन झालंय.
जितेश देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भासाठी खेळतो. मात्र राज्य पातळीवर पाहिलं तर जितेश अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनंतर महाराष्ट्रातून आयपीएलच्या 18 व्या मोसमात नेतृत्व करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी रहाणेने केकेआरचं तर ऋतुराजने सीएसकेचं नेतृत्व केलं आहे.
दरम्यान जितेश आरसीबीचं नेतृत्व करणारा नववा कर्णधार ठरला आहे. आरसीबीचं आयपीएलच्या इतिहासात याआधी राहुल द्रविड, अनिल कुंबळे, केविन पीटरसन, डॅनियल व्हीटोरी, विराट कोहली, शेन वॉटसन, फाफ डु प्लेसीस आणि रजत पाटीदार यांनी नेतृत्व केलंय.