किरकोळ कारणावरुन विवाहित महिलेस बेदम मारहाण करुन विष पाजण्याचा प्रयत्न, उपचार सुरु, गुन्हा दाखल
Marathi May 23, 2025 10:28 PM

सोलापूर : सोलापूर (Solapur)  जिल्ह्यातील टेंभुर्णीत धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कौटुंबिक कारणावरुन विवाहित महिलेला बेदम मारहाण आणि विष पाजण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. 11 मे रोजी विवाहित महिलेच्या दोन दीर आणि जाऊ यांनी बेदम मारहाण करतं त्यानंतर विष पाजण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. लाकडी काठ्या आणि लाथा बुक्याने केलेल्या मारहाणीत जखमी असलेल्या महिलेवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मागील 10 दिवसांपासून उपचार सुरु आहेत. चित्रा सतीश भोसले असं मारहाण झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दीर संतोष भोसले, निलेश भोसले, जाऊ निलीता संतोष भोसले, पूजा निलेश भोसले यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हे चौघे आरोपी अद्यापही फरार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हुंड्यासाठीही चित्रा भोसले यांना दिला होता त्रास

चित्रा भोसले यांचा 2006 साली सतीश भोसले यांच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर हुंड्यासाठी चित्रा भोसले यांना त्रास देण्यात आला म्हणून 2014 साली गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र, कुटुंबियांनी मध्यस्ती केल्यानंतर पुन्हा एकदा चित्रा भोसले नांदण्यास गेल्या होत्या. दिनांक 11 मे रोजी चित्रा भोसले यांच्या मुलात आणि आरोपी यांच्यात काही कारणाने वाद झाला होता. या वादानंतर आरोपी दीर संतोष भोसले, निलेश भोसले, जाऊ निलीता संतोष भोसले, पूजा निलेश भोसले यांनी मारहाण केल्याचा पीडितेच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे. दरम्यान या प्रकरणात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम वाढवून आरोपीना अटक करण्याची पीडित महिलेच्या कुटुंबियांनी मागणी केली आहे.

अलिकडच्या काळात हुंड्यासह इतर कारणावरुन विवाहित महिलांना त्रास देण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या कारमाणुळं अनेकदा महिला टोकाचं पाऊल देखील उचलताना दिसत आहेत. नुकतीच अशीच एक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेला सासरच्या मंडळीकडून सातत्याने त्रास दिला जात होता. तसेच माहेरुन पैसे आणण्याची मागणी केली जात होती. तसेच मारहाण देखील केली जात होती. यामुळेचं वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यानंतर पुन्हा पुण्यातील हडपसरमध्ये देखील अशीच घटना घडल्याचे समोर आले होते.

महत्वाच्या बातम्या:

हुंडा आणला नाही म्हणून सूनेला एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन दिलं, तरुणीची मृत्यूशी झुंज सुरु; सर्वांची झोप उडवणारा प्रकार

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.