सांगली : शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला गुंगीकारक पेय पाजून तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
विनय विश्वेष पाटील (वय २२, रा. महिपती निवास, अंतरोळीकर नगर, सोलापूर शहर), सर्वज्ञ संतोष गायकवाड (वय २०, रा. एफ ६०५, सरगम, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे), तन्मय सुकुमार पेडणेकर (वय २१, रा. ३०३ कासाली व्हिला, अभयनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले, की पीडिता सांगलीतील एका वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेत आहे. मंगळवारी रात्रीया तिघांनी तिला चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने वान्लेसवाडी येथील मित्राच्या खोलीवर आणले.
तेथे तिला गुंगीकारक पेय पाजून बलात्कार केला. याप्रकरणी पीडिताने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तीनही संशयितांना अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवस कोठडी सुनावली. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव करीत आहेत.