वडगाव मावळ, ता. २३ : मावळ पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने येथील आरोग्य उपकेंद्रात डेंगी व कीटकजन्य आजाराबाबत प्रदर्शनाद्वारे जनजागृती करण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई, जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शॅरन सोनवणे यांच्या सूचनेनुसार व डॉ. शुभांगी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली येथील आरोग्य उपकेंद्रात गुरुवारी प्रदर्शन भरविण्यात आले होते. डेंगी डासांच्या आळ्या, गप्पी मासे, धूर फवारणी यंत्र, मच्छरदाणी, विविध डास प्रतिबंधक वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. लसीकरणासाठी आलेल्या महिलांनी या प्रदर्शनाला भेट दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना डेंगीची लक्षणे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचाराबाबत माहिती दिली. डेंगी व कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती पत्रकांचे वाटप केले. आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा, परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन केले. आरोग्य पर्यवेक्षक दिलीप ठोंबरे, आरोग्य सहाय्यक जितेंद्र शेडगे, आरोग्य सेवक प्रदीप सोनवणे आदींसह आशा सेविकांनी संयोजन केले.