पुणे : पुणे शहरातील जुने वाडे पावसाळ्यात कोसळून आर्थिक व जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून १०२ धोकादायक वाड्यांपैकी १३ वाडे आत्तापर्यंत उतरवले आहेत. तर पुढील १५ दिवसात आणखी ६० वाडे उतरवले जाणार आहेत, अशी माहिती बांधकाम विभागातर्फे देण्यात आली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक जुने वाडे व इमारती आढळतात. या मिळकतींबाबत मालक व भाडेकरूंमध्ये तसेच काही ठिकाणी मालकांमध्येच वाद निर्माण झाले आहेत. अनेक प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे या इमारतींमध्ये कोणीही राहत नाही, तसेच त्यांची देखभाल व दुरुस्तीही होत नाही. परिणामी, या जुन्या इमारती अधिकच धोकादायक होत चालल्या आहेत.
पावसाळ्यात अशा इमारती कोसळण्याची शक्यता असते, म्हणून महापालिकेने दरवर्षी अशा मिळकतींचे सर्वेक्षण करून त्यांचे अतिधोकादायक, धोकादायक व कमी धोकादायक असे वर्गीकरण केले जाते. अतिधोकादायक ठरलेल्या इमारती पाडण्यात येतात व त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जातो. मात्र, काही वेळा मिळकतधारक कारवाईला विरोध करतात व न्यायालयात जातात. अशा वेळी न्यायालयाने स्थगिती दिल्यास पालिकेला कारवाई थांबवावी लागते.
जिथे दुरुस्ती शक्य आहे, तिथे ती तातडीने करण्याच्या सूचना दिल्या जातात आणि पावसाळ्यापूर्वी ती झाली की नाही याची खात्रीही घेतली जाते. महापालिकेच्या पाहणीत १०२ इमारती अथवा वाडे अतिधोकादायक श्रेणीत असल्याचे आढळले असून त्यापैकी ७७ ठिकाणी अजूनही नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे महापालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाच्या कलम १६० (ब) व (क) अंतर्गत नोटीस बजावत या इमारती रिकाम्या करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत महापालिकेने १३ वाड्यांचा धोकादायक भाग पाडला आहे, अशी माहिती बांधकाम विभागातर्फे देण्यात आली आहे.