इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शुक्रवारी (२३) लखनौला झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ४२ धावांनी पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे बंगळुरूचा नेट रन रेट घसरला असून ते दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावरही घसरले आहेत.
सध्या मध्ये प्लेऑफमध्ये खेळणारे ४ संघ निश्चित झाले आहेत. बंगळरुसह गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, आता या चार संघांमध्ये पहिल्या दोन क्रमांकांमध्ये येण्यासाठी चुरस आहे.
दरम्यान, जर हैदराबादला पराभूत केले असते, तर ते १९ गुणांसह अव्वल क्रमांकावर आले असते आणि त्यांनी पहिल्या दोन स्थानांमध्ये स्थान जवळपास पक्के केले असते. मात्र आता १३ सामन्यांनंतर बंगळुरू ८ विजय, ४ पराभव आणि १ अनिर्णित सामन्यासह १७ गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
दरम्यान, अद्यापही बंगळुरूला पहिल्या दोन क्रमांकांमध्ये येण्याची संधी आहे. पण आता त्यांना इतर तिन्ही संघांकडून यासाठी आव्हान मिळेल. कारण बंगळुरूच्या पराभवामुळे अन्य तिन्ही संघांना मात्र फायदा झाला आहे.
आता जर बंगळुरूला पहिल्या दोन क्रमांकांमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर त्यांना काहीही करून २७ मे रोजी लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्याविरुद्ध विजय मिळवावाच लागेल. असं झालं, तर ते १९ गुणांपर्यंत पोहचतील.
याशिवाय बंगळुरूला अशीही आशा करावी लागले की गुजरात टायटन्सने २५ मे रोजी होणारा चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा अखेरचा साखळी सामना पराभूत व्हावा. ज्यामुळे गुजरात १४ सामन्यांनंतर १८ गुणांवरच कायम राहिल आणि बंगळुरू त्यांच्या वर येतील.
किंवा बंगळुरूला अशी अपेक्षा करावी लागेल की पंजाब किंग्सने शेवटचे दोन सामने दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या संघांविरुद्ध पराभूत व्हावेत. ज्यामुळे पंजाब १७ गुणांवरच कायम राहतील.
तसेच जरी पंजाबने एक जरी सामना जिंकला, तरी त्यांनी तो मोठ्या फरकाने जिंकू नये आणि त्यांचा नेट रन रेट बंगळुरूपेक्षा कमी व्हावा. दरम्यान, पंजाबचा एक सामना मुंबई इंडियन्सविरुद्धही होणार आहे. मुंबई इंडियन्सचे १३ सामन्यांनंतर १६ गुण आहेत.
मुंबईने हा सामना जिंकला, तर त्यांचे १८ गुण होतील. पण जर पंजाबने हा सामना जिंकला, तर मुंबई १६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिल.
पंजाबचे २ सामने असल्याने त्यांना २१ गुणांपर्यंत पोहचण्याची संधी आहे. पण बंगळुरूला हीच अपेक्षा असेल की पंजाबने कमीत कमी एक सामना हरावा आणि त्याचसोबत बंगळुरूने त्यांच्या अखेरचा साखळी सामना मोठ्या फरकाने जिंकावा. ज्यामुळे बंगळुरू पहिल्या दोन स्थानामध्ये कायम राहिल.
किंवा जर पंजाबने दोन्ही सामने जिंकले, तर गुजरातने चेन्नईविरुद्ध पराभव स्वीकारावा आणि बंगळुरूने लखनौला पराभूत करावं. तरच बंगळुरू पहिल्या दोन स्थानांमध्ये कायम राहुन क्वालिफायर १ सामना खेळण्याची संधी मिळेल.
दरम्यान, बंगळुरूने जर उर्वरित साखळी सामना लखनौविरुद्ध पराभूत झाला, तर मात्र त्यांना पहिल्या दोन स्थानामध्ये स्थान मिळवता येणार नाही आणि त्यांना एलिमिनेटर खेळावा लागले.
तसेच जर गुजरातने चेन्नईला पराभूत केलं आणि पंजाबनेही दोन्ही सामने जिंकले. तर मात्र बंगळुरूला शेवटचा साखळी सामना जिंकूनही पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवता येणार नाही. त्यामुळे या दोन्ही संघांच्या सामन्यावर बंगळुरूला अवलंबून रहावे लागणार आहे.