भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यापूर्वी इंग्लंड संघ झिम्बाब्वेविरुद्ध गुरुवारपासून (२२ मे) चार दिवसीय कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडची पकड मजबूत झाली आहे. या सामन्याचा दुसरा दिवस संपला, तेव्हा इंग्लंड २७० धावांनी आघाडीवर होते.
नॉटिंगघम येथे होत असलेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवशी इंग्लंडने ८९ व्या षटकापासून ३ बाद ४९८ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. पण दीडशतक केलेला ऑली पोप सुरूवातीलाच बाद झाला. त्याने १६६ चेंडूत २४ चौकार आणि २ षटकारांसह १७१ धावांची खेळी केली.
त्यापाठोपाठ बेन स्टोक्सही ९ धावांवर बाद झाला. पण हॅरी ब्रुकने अर्धशतक केले. पण ब्रुकला ५८ धावांवर ब्लेसिंग मुझराबनीने त्रिफळाचीत केले. त्याच्या विकेटसह ९६.३ षटकात ६ बाद ५६५ धावांवर डाव घोषित केला.
इंग्लंडकडून या डावात झॅक क्रावलीने १२४ धावांची आणि बेन डकेटने १४० धावांची खेळी केली. झिम्बाब्वेकडून गोलंदाजी करताना मुझराबनीने ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर झिम्बाब्वे संघ फलंदाजीला उतरला. झिम्बाब्वेने पहिली विकेट बेन करनच्या रुपात पाचव्याच षटकात गमावली. पण नंतर सलामीवीर ब्रायन बनेटला कर्णधार क्रेग एर्विनने चांगली साथ दिली. या दोघांनी ६५ धावांची भागीदारीही केली. पण अखेर ही भागीदारी २१ व्या षटकात शोएब बाशिरने एर्विनला ४२ धावांवर बाद करत तोडली.
पण तरी नंतर सीन विल्यम्सने बनेटला साथ देताना ६० धावांची भागीदारी केली. विल्यम्सने २५ धावांची खेळी केली. मात्र क्यानंतर सिकंदर रझा (७) आणि मधवेरे (०) यांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या. पण तफाद्झवा त्सिगा बनेटला साथ देत होता.
बनेटनेही एक बाजू भक्कमपणे सांभाळताना शतकी खेळी केली होती. त्याच्या शतकाने इंग्लंडला काही वेळ दबावात आणले होते.
पण बनेटला अखेर जोश तोंग्यूने १३९ धावांवर ओली पोपच्या हातून झेलबाद केले. त्याने १४३ चेंडूत २६ चौकारांसह १३९ धावांची खेळी केली. त्यानंतर त्सिगाने २२ धावांची खेळी केली. पण नंतर शेवटच्या चार विकेट्स झिम्बाब्वेने झटपट गमावल्या.
झिम्बाब्वेचा डाव ६३.२ षटकात २६५ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे इंग्लंडला ३०० धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे इंग्लंडने झिम्बाब्वेला फॉलोऑन दिला.
इंग्लंडकडून गोलंदाजी करताना शोएर बाशीरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच गस ऍटकिन्सन आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी २ विरेट्स घेतल्या. सॅम कूक आणि जोश तोंग्यू यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
झिम्बाब्वेने दुसऱ्या डावात मात्र बनेटची विकेट चौथ्याच षटकात एका धावेवर गमावली. गस ऍटकिन्सनने त्याला पायचीत केले. एर्विनही २ धावा करून बाद झाला. त्याला जोश तोंग्यूने बाद केले.
पण नंतर बेन करन आणि सीन विल्यम्स यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत आणखी विकेट जाऊ दिल्या नाहीत. बेन करन २६ चेंडूत ४ धावांवर नाबाद आहे. तसेच सिन विल्यम्स ११ चेंडूत २२ धावा करून नाबाद आहे. झिम्ब्बावेने १० षटकात २ बाद ३० धावा केल्या आहेत.