Nashik : पुण्यात वैष्णवी, नाशिकमध्ये भक्ती; सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या, नवरा फरार
Saam TV May 24, 2025 03:45 PM

तरबेज शेख, नाशिक प्रतिनिधी

Married woman suicide Nashik : पुण्यामधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना नाशिकमधूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरातील अथर्व योगेश गुजराती वय 40 यांची पत्नी भक्ती अथर्व गुजराती वय 37 यांचे घरातील जाचाला कंटाळून गळफास घेऊन आयुष्य संपवले. भक्तीच्या कुटुंबियांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली. गंगापूर रोड स्टेशन येथे याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे व्यवसायने सराफी आहेत. आपल्या मुलीने आत्महत्या केली असे कळताच त्यांनी नाशिक येथे येऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे. मृत भक्ती अथर्व गुजराती यांना ५ वर्षाचा मुलगा असून भक्ती गुजराती यांच्या माहेरच्या कुटुंबीयांना फरार भक्तीचे पती अथर्व गुजराती यास लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. घटनेचा अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्ये एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. मृत भक्ती यांना सासरच्यांनी मारहाण केली की पैशांचा तगदा लावला, भक्तीने टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.